आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांचे उपोषण सहाव्या दिवशी सुटले. भाजप आमदार सुरेश धस यांनी सरकार मागण्यांबद्दल सकारात्मक असल्याचे सांगितल्यानंतर जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर केले. यापुढे उपोषण न करता थेट समोरासमोर लढणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. नियोजन करुन आता दोन कोटी मराठे मुंबईत धडक देतील. मुंबई जाम होऊ शकते पण मराठे माघार घेणार नाहीत, असे जरांगे म्हणाले.
मंत्री कोणत्या घरात राहतात, कसे राहतात, कोणत्या कपात चहा घेतात… ते मुंबईत येऊन पाहायचे आहे. यावेळी मुंबईला जाताना अडवले तर मंत्री आणि आमदारांना हाणायचे, असा इशाराही त्यांनी दिला. फडणवीस मराठाद्वेषी असल्याचा आरोपही त्यांनी केला.