क्रिकेटपटू श्रेयस गुरव याचे कौतुक करताना प्रशिक्षक राजन धोत्रे(छाया : बजरंग वाळुंज)
Published on
:
02 Feb 2025, 4:50 am
Updated on
:
02 Feb 2025, 4:50 am
डोंबिवली : नीलेश कुलकर्णी आणि अजिंक्य राहणे या दोन्ही क्रिकेटपटूंनंतर श्रेयस गुरव याच्या रूपाने डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. क्रिकेटमध्ये मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवलीकर क्रिकेटपटू श्रेयस गुरव याची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे. क्रिकेटर श्रेयसचा रणजी संघ निवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. या क्षणाची श्रेयसचे प्रशिक्षक आणि सहकारी क्रिकेटपटू वाट पाहत होते. अखेर मुंबई रणजी संघात श्रेयस याची निवड झाली.
श्रेयसची मुंबई रणजी संघात निवड व्हावी यासाठी प्रत्येकाची इच्छा होती. अखेर इच्छेप्रमाणे निवड झाल्याने श्रेयसचे क्रिकेटमधील ज्येष्ठ प्रशिक्षक राजन धोत्रे आणि सहकारी मित्रांनी समाधान व्यक्त केले आहे. क्रिकेटर श्रेयस गुरव हा डोंबिवली पूर्वेकडील सारस्वत काॅलनीमध्ये राहत असून तो स. वा. जोशी शाळेचे विद्यार्थी आहे. विद्यार्थी दशेपासून श्रेयसला क्रिकेट खेळण्याची आवड होती. चौथ्या इयत्तेमध्ये असल्यापासून श्रेयसने डोंबिवलीतील क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे यांच्याकडे प्रशिक्षणाला सुरूवात केली. या प्रशिक्षणातून श्रेयसला क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाचे मार्गदर्शन मिळाले. कष्ट आणि अथक मेहनतीने सराव करण्याच्या गुणांमुळे श्रेयसने रणजी संघातील निवडीचा मोलाचा पल्ला गाठल्याचे प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी सांगितले.
श्रेयस सुरूवातीला वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जायचा. नंतर त्याने त्याची गोलंदाजीची पध्दत हळुहळू बदलली. आता तो स्पीनर गोलंदाज म्हणून ओळखला जातो. डावखुरा गोलंदाज असलेला श्रेयस मुंबईतील कीर्ती महाविद्यालयासह एमआयजी क्लबतर्फे खेळला आहे. अवघ्या वर्षभरात श्रेयसने तब्बल 84 फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या हे कौतुकास्पद असल्याचे प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी दिली.
रणजी संघात निवड झालेला श्रेयस हा तिसरा डोंबिवलीकर आहे. यापूर्वी नीलेश कुलकर्णी आणि अजिंक्य राहणे या दोघांची रणजी संघात निवड झाली होती. या दोन्ही क्रिकेटपटूंप्रमाणेच श्रेयस देखील रणजीमध्ये दमदार खेळी करू शकेल, असा विश्वास त्याच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला. तर स्थानिक आमदार रविंद्र चव्हाण आणि प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी निवडीबद्दल श्रेयसचे कौतुक केले.
डावखुरा गोलंदाज असलेला श्रेयस हा मेहनती क्रिकेटपटू आहे. त्याची मुंबई रणजीमध्ये निवड व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. आणि त्याप्रमाणेच घडले. या निवडीला आपल्या दमदार खेळीतून न्याय देईल. यातून त्याला पुढे जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्याला या खेळात उज्वल भवितव्य असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी दिली.