गुन्हे घडूनही पोलिसांना उकल करण्यात यश आलेले नाहीpudhari
Published on
:
24 Jan 2025, 9:21 am
Updated on
:
24 Jan 2025, 9:21 am
नगर : नगर शहर गत वर्षभरात चोरांनी टार्गेट केल्याचे दिसून येते. वर्षभरात घरफोडी, चोरी असे सुमारे 525 गुन्हे करत चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारला. त्यातील फक्त 89 गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले. 446 गुन्हे आजही पोलिस दप्तरी तपासावर असल्याचे दिसून येते. दरम्यान, 1 जानेवारीपासून चोरींनी पुन्हा नगर शहर टार्गेट केल्याचे दिसत आहे. तोफखाना, कोवताली हद्दीत अनेक गुन्हे घडूनही पोलिसांना उकल करण्यात यश आलेले नाही.
अहिल्यानगर शहरात दिवसेंदिवस नागरी वस्तीचे प्रमाण वाढत आहे. आजमितीला शहरात सुमारे एक लाखाच्या पुढे निवासी व व्यापारी मालमत्ता आहे. शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखाच्या पुढे आहे. त्यामुळे शहरात रस्ते, व्यापारी संकुले नेहमीच गर्दी गजबजलेली असतात. बाजार समिती, कापड बाजार, हॉस्पिटल अशा विविध गोष्टींसाठी अहिल्यानगर शहर प्रसिद्ध आहे. त्यामुळे व्यापारी वर्गाची नेहमीच वर्दळ असते. अशातच गत वर्षामध्ये अहिल्यानगर शहरात सुमारे 525 चोर्या, घरफोड्या झाल्या आहेत.
तोफखाना व कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केडगाव, बोल्हेगाव, सावेडीगाव, सावेडी उपनगर, बालिकाश्रम रोड, मुकुंदनगर, मुख्य शहर, बाजारपेठ, विनायक नगर या भागात घरफोड्या, दुचाकी चोरी करून सुमारे लाखोंचा मुद्देमाल लांबविला. पोलिसांकडून रात्रीची गस्त घातली जाते तरीही चोर पोलिसांना शिरजोर होतात. बंद घराचा दरवाजा तोडून हात साफ करतात. गेल्या वर्षात चोरांनी 25 घरफोड्या दिवसा केल्या आहेत. तर, 50 घरफोड्या रात्रीची वेळ साधून केल्या आहेत.
दरम्यान, 2024 मधील चोरी, घरफोडीचा आकडा वाढता असतानाच चोरींनी पुन्हा नगर शहर टार्गेट केले आहे. 1 जानेवारीपासून चोरांनी स्टेशन रोड, सावेडी, भिस्तबाग, बालिकाश्र रोड, कोठला मंगलगेट परिसरात चोरी करून लाखोचा ऐवज लांबविला. त्यातही पोलिसांना अद्यापि चोरांचा मागमूस लागलेला नाही. त्यामुळे नागरिक हवालदिल झाले असून, पोलिसानी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
कोतवाली, तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरामध्ये रस्तालुटीच्या सुमारे 58 घटना घडल्या. मात्र, त्यातील अवघ्या 29 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. तर, रस्तालुटीच्या 29 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिस अपयशी ठरले.
भिंगार, एमआयडीसी आलेख पडता
भिंगार पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीच्या 75 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी अवघ्या 7 गुन्ह्यांची उकल करण्यात भिंगार कॅम्प पोलिसांना यश आले. तर, एमआयडीसी पोलिस ठाण्यात चोरी, घरफोडीचे 129 गुन्हे दाखल झाले असून, त्यातील अवघ्या 12 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
चौका-चौकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याचे तांत्रिक विश्लेषण केले आहे. त्यातून काही संशयितांचे स्केच तयार करण्यात आले. लवकरच अनेक गुन्ह्यांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश येईल.
अमोल भारती, पोलिस उपअधीक्षक नगर शहर