Nagpur: अ‍ॅडव्हांटेज विदर्भ महोत्सवामुळे विदर्भ क्षेत्र उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

2 hours ago 2

नागपूर (Nagpur) :- गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग पुरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे. पर्यटन, उद्योग व दळण-वळण अशा एकानेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ हे महत्वपूर्ण आयोजन येत्या काळात विदर्भातील उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उद्योग, रोजगार निर्मिती आदींच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला गती मिळाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यावेळी सांगितले.

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सवा’ चे थाटात उद्घाटन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025-खासदार औद्योगिक महोत्सवा’ चे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे ही राज्यात निर्मिती क्षेत्राची राजधानी म्हणून आकाराला येत आहे. राज्यातील अन्य भागातही उद्योग वाढीस लागत आहेत. नुकत्याच दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) महाराष्ट्रासाठी 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. राज्याच्या सर्वच भागात उद्योग वाढीसाठी गुंतवणूक आणण्यात आली आहे. यात विदर्भासाठी 5 लाख कोटींच्या करारांचा समावेश असून गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यु उद्योग समुहाने 3 लाख कोटींची गुंतवणूक करार केले आहेत.

गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे बॅटरी निर्माण, सौरऊर्जा आदी प्रकल्प उभे राहणार आहेत. हे सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती

गडचिरोलीत गुंतवणूक होत असल्याने नक्षलप्रभावीत जिल्हा म्हणून ओळख पुसून आशिया खंडातील सर्वात मोठे स्टिलहब येथे उभारले जाणार आहे. लगतच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही गडचिरोलीतील (Gadchiroli) गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. गडचिरोलीत येत्या काळात विमानतळ उभारण्यात येणार आहे. अमरावती येथील टेक्सटाइल झोनमध्ये लवकरच उद्योजकांनी जागा व्यापली आहे व आता तिथे अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार आहोत. पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून येथे वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक सक्षम करण्यात येईल.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, राज्याच्या एकूण खनिज संपत्तीच्या 75 टक्के खनिज विदर्भात आहे. एकूण वनक्षेत्राच्या 80 टक्के वन विदर्भात आहे. ही जमेची बाब असून येथे पर्यटन व उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे यासाठी दोन दशकांपासून कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेत या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले. येथे उद्योगांच्या माध्यमातून गुंतवणूक ओढून आणत येथील नक्षलवाद, गरिबी, बेरोजगारी दूर करण्याच्या दिशेने कामाला सुरूवात झाली आहे. ॲडव्हांटेज विदर्भच्या आयोजनातून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग वाढीसाठी पुरक वातावरण निर्माण करण्याचे उद्दीष्ट असून येत्या 4 वर्षात यास गती देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

दावोसमध्ये राज्यातील समतोल औद्योगिक विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आले

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, दावोसमध्ये राज्यातील समतोल औद्योगिक विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आले. राज्य शासन उद्योगपुरक सोयी सुविधा व वातावरण निर्माण करीत आहे. परिणामी राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. यास अधिक गती देवून भविष्यात हा आलेख वाढविण्यात येईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या स्थानी घेवून जाण्याच्या उद्दीष्टपुर्तीसाठी महाराष्ट्र महत्वाचे योगदान देईल यासाठी ॲडव्हांटेज विदर्भ सारखे आयोजन महत्वाची भूमिका पार पाडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यभर असे आयोजन व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

जे.एस.डब्ल्यू उद्योग समुहाचे व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल म्हणाले, गडचिरोलीसह विदर्भात 3 लाख कोटींची गुंतवणूक होत आहे. याचा फायदा स्थानिकांना होवून विदर्भ जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसेल. एचसीएल कंपनीच्या प्रमुख रोषणी मल्होत्रा म्हणाल्या, नागपूरातील मिहानमध्ये 2018 पासून एचसीएल कार्यरत असून 5 हजार 500 बेरोजगारांना रोजगार देण्यात आला आहे. यात 40 टक्के महिलांचा समावेश आहे. लॉईड मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बालकृष्णन प्रभाकरण यांनी गडचिरोली जिल्ह्यात आम्ही दोन वर्षात 10 हजार रोजगार निर्माण करणार असल्याचे सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article