यंदा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी महिला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून आला(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
:
21 Nov 2024, 4:00 am
Updated on
:
21 Nov 2024, 4:00 am
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरा जागांसाठी बुधवारी (दि.२०) मतदान घेण्यात आले. मतदारांनी दाखविलेल्या उत्साहामुळे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढला असून सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली. ग्रामीण भागात काही केंद्रांवर रात्री आठनंतरही रांगा कायम असल्याने मतदानाच्या टक्का आणखी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदिस्त झाले असून शनिवारी (दि.२३) मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, नांदगावमधील राड्यामुळे जिल्ह्यातील मतदानाला काहिसे गालबोट लागले.
यंदा महिला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
शहरापेक्षा ग्रामीण भागात मतदानाच उत्साह
जिल्ह्यात ठिकठिकाणी किरकोळ वादाच्या घटना
सायंकाळी ६ पर्यंतची मतदान टक्केवारी
नांदगाव ५९.९३
मालेगाव मध्य ६१.५८
मालेगाव बाहय ६७.५४
बागलाण ५३.८४
कळवण ७०.३५
चांदवड ६५.०१
येवला ६८.६९
सिन्नर ६३.८५
निफाड ६३.२५
दिंडोरी ७१.९७
नाशिक पूर्व ४९.०५
नाशिक मध्य ५६.३४
नाशिक पश्चिम ५०.३९
देवळाली ५५.०८
इगतपुरी ६९.३९
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात सकाळी सातपासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला. थंडीचा कडाका जाणवत असतानाही सकाळच्या सत्रात महिला व ज्येष्ठ मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी गर्दी केली. सकाळी ११ नंतर युवावर्ग मतदानासाठी घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरी भागापेक्षा ग्रामीण मतदारसंघामध्ये यंदा मतदानाचा उत्साह अधिक होता. सायंकाळी सहापर्यंत जिल्ह्यात सरासरी ६० टक्के मतदानाची नोंद झाली. दिंडाेरी मतदारसंघात सर्वाधिक ७२ तर नाशिक पूर्व मतदारसंघात सर्वात कमी ४९.०६ टक्के मतदान नोंदविले गेले. मात्र, शहरी व ग्रामीण भागातील काही केंद्रांवर रात्री उशिरापर्यंत रांगा कायम असल्याने रात्री ८ पर्यंत साधारणत: ६५ टक्के मतदान झाले असून त्यात अधिक वाढ होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यात सकाळपासून शांततेत मतदानास प्रारंभ झाला असताना येवल्यातील खरवंडी ग्रामस्थांनी मंत्री छगन भुजबळ यांना विरोध दर्शविला. त्यामुळे मंत्री भुजबळ यांना माघारी परतावे लागले. तर मतदानावेळी नांदगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे व अपक्ष समीर भुजबळ समर्थक एकमेकांमध्ये भिडल्याने राडा झाला. परंतु, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शांत केले. सदर प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली.
विधानसभेच्या पंधरा जागांसाठी जिल्ह्यात मतदान पार पडल्यानंतर साऱ्यांच्याच नजरा शनिवारच्या (दि. २३) निकालाकडे लागल्या आहेत. सायंकाळी सहानंतर मतदान पार पडल्यानंतर चौकाचौकात निकालाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. उमेदवार व त्यांचे समर्थक मतदानाची आकडेमोड करण्यात व्यस्त दिसले. यावेळी विजयाचा गुलाल आपलाच असणार, असा दावा प्रत्येक उमेदवाराचे समर्थक व्यक्त करत होते.