Published on
:
18 Jan 2025, 6:31 am
Updated on
:
18 Jan 2025, 6:31 am
नाशिक : गत दोन वर्षांपासून जिल्ह्यातील बालमृत्यूंचे प्रमाण घटल्याचे आकडेवारीतून उघड झाले आहे. १ एप्रिल २०२४ पासून आजतागायत सुमारे ४२३ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. मात्र, मागील पावणेचार वर्षांत तब्बल १,९८५ बालमृत्यूंची गंभीर नोंद झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, ही सर्व बालके ० ते ५ वयोगटातील असून, त्यातील बहुसंख्य कमी वजनाची होती. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत बालमृत्यू समितीच्या बैठकीतून ही बाब अधोरेखित झाली आहे.
बालमृत्यू कमी करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महिला व बालविकास विभागाच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गर्भवती महिलांसह स्तनदा माता आणि बालकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांमुळे मागील दोन वर्षांत सुमारे १५० बालमृत्यूंमध्ये घट झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे बालमृत्यूंचे प्रमाण कमी झाले असले, तरी ते पूर्णतः नियंत्रणात येण्यासाठी अजूनही अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे भविष्यात या समस्येवर मात करण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना अपेक्षित आहेत.
वर्षनिहाय झालेले बालमृत्यू
- सन २०२१-२२ मध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील ५५१ बालकांचा मृत्यू झाला. ० ते ५ वर्ष वयोगटातील १०५ बालकांना मृत्यूने गाठले. या वर्षात एकूण ८१ हजार २२५ बालके जन्माला आली. हा दर ८ टक्के होता.
- २०२२-२३ मध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील ५४० बालके दगावली. तर ० ते ५ वर्ष वयोगटातील १०५ बालकांनी जीव गमावला. म्हणजे एक वर्षातील मृत्यू होणाऱ्या बालकांची संख्या ११ ने कमी झाली. बालमृत्यू कमी झाला असला तरी, बालमृत्यू दरा हा ९ टक्के होता.
- २०२३-२४ मध्ये ० ते १ वर्ष वयोगटातील ४२३ बालके दगावली. तर ० ते ५ वर्ष वयोगटातील ८६ बालकांनाही मृत्यूने गाठले. सन २०२४ च्या आतापर्यंत बालमृत्यूचे प्रमाण बऱ्यापैकी होते. या अकरा महिन्यात ० ते १ वयोगटातील १३५ आणि ० ते ५ वर्ष वयोगटातील ४० बालकांचा मृत्यू झाला.हा दर 7 टक्के अतका आहे.
बालमृत्यू रोखण्यासाठी सुरू असलेले उपाय
जिल्ह्यातील बालमृत्यू कमी करण्यासाठी जिल्हा परिषद आणि आयआयटी मुंबईच्या सहकार्याने गरोदर व स्तनदा मातांना प्रशिक्षण दिले जाते. बालकांच्या देखभालीसाठी समुपदेशन, आशासेविका व अंगणवाडीसेविकांचे प्रशिक्षण, पोषण पुनर्विकास केंद्राची उभारणी, तसेच माता-बालकांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते.
ही आहेत बालमृत्यूची कारणे
- अकाली जन्माला आलेले बाळ
- जन्मतःच कमी वजनाचे बालक
- कुपोषण, जंतु संसर्ग, न्यूमोनिया, सेप्सीस
- जन्मतः श्वासावरोध रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम
आदिवासी भागात वेळेआधी प्रसूती होण्याचे प्रमाण अधिक आहे. वेळेआधीच जन्माला येणाऱ्या बालकांचे वजन कमी असल्यास त्यास विविध आजारांची लागण झालेली असते. त्यामुळे कमी वजन हे बालमृत्यूचे प्रमुख कारण आहे.
- डॉ. हर्षल नेहेते, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी