मोहाडी पंचायत समितीत युतीत रस्सीखेच:सभापदीपदासाठी दोन पक्षाकडे समान संख्याबळ; विद्यमान व माजी आमदाराची प्रतिष्ठा पणाला
3 hours ago
1
सत्तासुंदरीच्या खेळात पदाच्या संगीत खुर्चीसाठी दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या राजकारणात फोडाफोडी करणे सामान्य बाब झाली आहे. सत्तेच्या सारीपटासाठी आपल्याच पक्षाची सत्ता बसली पाहिजे, यासाठी नेतेमंडळी वाटेल तो आटापिटा करतात हे आता सर्वश्रृत झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी 20 जानेवारीला होणारी निवडणूक आमदार राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे यांच्या प्रतिष्ठेची झाली आहे. सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीत भाजप तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे संख्याबळ सारखे आहे. त्यामुळे होणारी निवडणूक टॉसवर होणार की, फोडाफोडीच्या राजकारणामुळे पंचायत समितीचा सभापती आपल्याच पक्षाचा खास ठरणार? याची उत्सुकता तालुकावासियांना लागली आहे. मोहाडी पंचायत समितीचे सभापतिपद सर्वसाधारण पदासाठी आरक्षण असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे तसेच भारतीय जनता पक्षाचे पंचायत समिती सदस्य सभापती बनण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुन्हा रितेश वासनिक यांच्या नावावर विचार होऊ शकतो. तसेच भाजपकडून राष्ट्रवादी पक्षात आलेले पंचायत समिती सदस्य जगदीश शेंडे व बाणा सव्वालाखे यांचेही नाव सभापतीसाठी आघाडीवर आहेत. भाजपाकडून विठ्ठल मलेवार, कैलाश झंझाड, रेवानंद चकोले यांचे नाव विचारात घेतले जात आहे. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार राजू कारेमोरे यांनी विरोधकांच्या पंचायत समिती सदस्यांमध्ये खिंडार पाडले होते. यासाठी मोठे रणकंदन झाले. भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले सगळे आठही पंचायत समिती सदस्य त्यानंतर भारत राष्ट्र समिती पक्षाच्या गटात सामील झाले. आता मात्र त्यातील एक पंचायत समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) सामील झालेला आहेत. त्यामुळे भारत राष्ट्र समितीकडे सात सदस्य उरले आहेत. त्यामुळे बहुमताची संख्या व सहजतेने सभापती व उपसभापती पदांची निवडणूक जिंकण्यासाठी फोडाफोडी होईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात बांधला गेला होता. झालेही तसेच, भाजपकडील म्हणजे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटातील एक पंचायत समिती सदस्य फोडण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) यश आल्याची खात्रीलायक माहिती आहे. तसेच आणखी विरोधी गटातील सदस्य फुटण्याची माहिती आहे. ही फोडाफोडी टाळण्यासाठी पंचायत समिती सदस्य सहलीला निघाल्याची माहिती आहे. सभापती, उपसभापती पदाची निवडणूक आता अटीतटीची होणार का? याच्याकडे लक्ष लागले आहे. बहुमत नसताना राष्ट्रवादीचा सभापती तीन वर्षांपूर्वी भाजपकडे आठ पंचायत समिती सदस्याचे संख्याबळ असताना अनुसूचित जाती प्रवर्गाचा पंचायत समिती सदस्य नसल्याने आयती संधी राष्ट्रवादी पक्षाकडे चालून आली. त्यामुळे बहुमत नसताना रितेश वासनिक सभापती बनले होते. आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा दावणीला आमदार राजू कारेमोरे व माजी आमदार चरण वाघमारे या दोघांमध्ये सभापती पदाची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. एक वर्षापूर्वी सभापती रितेश वासनिक यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल झाला होता. परंतु आमदार कारेमोरे यांनी अविश्वासाचा डाव उलटवला. त्यानंतर कारेमोरे यांनी भाजपत खिंडार पाडले आणि पंचायत समिती सदस्यांचे संख्याबळ सारखे केले आहे. अभ्यासी अधिकाऱ्यांची केली नियुक्ती
मोहाडी पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. भंडारा येथील उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे यांची अध्यासी अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. आता 20 तारखेला होणाऱ्या पदांच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)