आरजी कार मेडिकल कॉलेज-हॉस्पिटलमधील महिला डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आराेपी संजय रॉय.(File Photo)
Published on
:
18 Jan 2025, 9:08 am
Updated on
:
18 Jan 2025, 9:08 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणी आज शनिवारी (दि.१८) सियालदह न्यायालयाने मुख्य आरोपी संजय रॉय याला दोषी ठरवले. त्याला सोमवारी शिक्षा सुनावली जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. या खटल्याच्या ५७ दिवसांनंतर सियालदह न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयाने निकाल दिला. दरम्यान, निकाल सुनावणीवेळी मुख्य आरोपी संजय रॉय याला न्यायालयात आणले होते.
कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टर मृतावस्थेत आढळून आली होती. या घटनेवरुन देशभर डॉक्टरांनी निर्देशने करुन संताप व्यक्त केला होता. या प्रकरणी कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.
या प्रकरणाचा तपास कोलकाता उच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवला होता. संपूर्ण तपासाच्या टप्प्यात सीबीआयने एक आरोपपत्र दाखल केले. त्यात संजय रॉय हाच बलात्कार आणि खून प्रकरणातील एकमेव मुख्य आरोपी असल्याचे म्हटले.
सीबीआयने माजी प्राचार्य संदीप घोष आणि स्थानिक पोलिस स्थानकाचे माजी अधिकारी अभिजित मोंडल यांना पुराव्यांशी छेडछाड आणि पुरावे बदलल्याच्या आरोपाखाली अटक केली.
संजय रॉय विरुद्ध आरोप निश्चित
त्याच्या अटकेच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत सीबीआयने त्यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले नाही. यामुळे नंतर त्याच विशेष न्यायालयाने दोघांनाही डिफॉल्ट जामीन मंजूर केला. संजय रॉय याच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२४ रोजी विशेष न्यायालयात पूर्ण झाली. त्यानंतर ११ नोव्हेंबर रोजी खटला सुरू झाला.
संपूर्ण खटल्याची सुनावणी इन- कॅमेरा सुनावणी
संपूर्ण खटल्याची सुनावणी इन- कॅमेरा आणि बंद कोर्टरुममध्ये घेण्यात आली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान एकूण ५० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. यात पीडितेचे पालक, सीबीआय, कोलकाता पोलिसांतील तपास अधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि काही डॉक्टर आणि पीडितेचे सहकारी यांचा समावेश होता.
हजारो लोक रस्त्यावर उतरले
या घटनेच्या निषेधार्थ १४ ऑगस्ट २०२४ रोजी पश्चिम बंगालमध्ये हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. तसेच संतप्त जमावाने आरजी कार रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाची तोडफोड केली. यावेळी पुराव्यांशी छेडछाड केल्याचे आरोप करण्यात आले होते.