Published on
:
01 Feb 2025, 4:44 am
Updated on
:
01 Feb 2025, 4:44 am
मालेगाव : जन्मदाखला मिळविण्यासाठी तिघांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याचे निष्पन्न झाले असून, अशा तिघांविरोधात तहसीलदार विशाल सोनवणे यांनी छावणी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या दिली आहे. घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्या नागरिकांना मालेगावातून जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप करीत सोमय्या यांनी, 100 जणांची यादी पुराव्यासह छावणी पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या चौकशीत तिघांनी खोटे कागदपत्रे सादर केल्याचे उघड झाले आहे.
घुसखोरांना जन्मदाखला प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या माहितीसाठी सोमय्या हे शुक्रवारी (दि. 31) मालेगावी आले होते. त्यांनी छावणी पोलिस ठाणे, महापालिका व धान्य पुरवठा कार्यालयाला भेट दिली. छावणी पोलिस ठाण्यात अधिकार्यांशी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, पंधरवड्यापूर्वी जन्म प्रमाणपत्र दाखल करणार्या 100 संशयितांच्या नावांची यादी पुराव्यासह पोलिसांना देऊन लेखी तक्रार दिली होती. त्याआधारे झालेल्या चौकशीत तिघांकडे भारतीय नागरिकत्व तसेच शहरात वास्तव्याचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. त्यानुसार सय्यद साजिद वाहब, शबानाबानो शेख हनिफ, नजमाबानो अब्दुल शारुर या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. आजपर्यंत चार हजारांपेक्षा अधिक जन्म प्रमाणपत्र वाटप झाले असून, चौकशीतून हा आकडा वाढण्याची शक्यता सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
मी दिलेल्या अर्जावर अजूनही चौकशी सुरू आहे. याप्रकरणी जन्म प्रमाणपत्रे देणारे तहसीलदार, नायब तहसलीदार यांच्यासह अन्य तीन कर्मचाऱ्यांचे यापूर्वीच निलंबन झाले आहे. जन्म प्रमाणपत्र देण्यासाठी मदत करणार्या 12 एजंटांची नावे पोलिसांना दिली आहेत. 'त्या' एजंटाबरोबरच ज्या चार हजार अर्जदारांनी जन्म प्रमाणपत्रासाठी अर्ज केले, त्या सर्वांची चौकशी करण्याची मागणीही सोमय्या यांनी यावेळी केली.
दरम्यान, तहसीलमधील धान्यपुरवठा कार्यालयात 100 लोकांची यादी दिली होती. या संदर्भात काय चौकशी झाली हे जाणून घेण्यासाठी सोमय्या यांनी धान्य वितरण अधिकारी पंकज खैरनार यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. त्यातील गोषवारा मात्र समजू शकला नाही.
तहसील कार्यालयामार्फत गेल्या वर्षभरात चार हजारांपेक्षा अधिक नागरिकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले. जोपर्यंत न्यायालयामार्फत जन्म प्रमाणपत्र दिले जात होते तेव्हा ते प्रमाण नगन्य होते. मात्र, 2023 जुलैनंतर तहसीलदार यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार देण्यात आला. तेव्हा हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले. यासंदर्भात महापालिकेने जिल्हाधिकारी यांना कळवायला हवे होते, अशा शब्दांत सोमय्या यांनी मनपा अधिकार्यांविरोधात नाराजी व्यक्त केली.
राष्ट्र सुरक्षेला प्राधान्य
सोमय्या हे मालेगावची बदनामी करीत आहेत. ते वारंवार मालेगावी येऊन प्रशासनावर दबाव टाकतात, असा आरोप मॉयनॉरिटी डिफेन्स कमिटीच्या पदाधिकार्यांनी केला आहे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता सोमय्या म्हणाले, 'देशाच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य आहे. विरोधकांना देशाची सुरक्षा महत्त्वाची नाही. व्होट जिहाद त्यांना महत्त्वाचे वाटते. त्यामुळे कोण काय बोलत आहे, याकडे मी लक्ष देत नाही'.