Published on
:
21 Nov 2024, 4:25 am
Updated on
:
21 Nov 2024, 4:25 am
नाशिक : नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान महायुती आणि मविआ कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान राड्याचे मतदानाच्या दिवशी पडसाद उमटतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, सायंकाळचा अपवाद वगळता दिवसभर मतदान अत्यंत शांततेच्या वातावरणात पार पडले. बुधवार (दि.20) सायंकाळी सातपूर आणि पवननगर परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे मविआ कार्यकर्ते आमनेसामने आले होते. यावेळी शाब्दिक चकमक झाल्याने, पोलिसांनी लगेचच मध्यस्थी करीत वाद मिटवला.
पश्चिममध्ये सकाळपासूनच मतदानाला चांगला प्रतिसाद लाभला. मतदारांनी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, मतदानाच्या अंतिम टप्प्यात सातपूरसह पवननगर परिसरात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातपूर कॉलनी येथील प्रगती शाळेबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी बटेंगे तो कटेंगे अशा आशयाचे टी-शर्ट परिधान करीत मतदरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यास शिवसेना ठाकरे गटाने आक्षेप घेतल्याने, दोन्ही गट आमने-सामने आले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याअगोदरच पोलिसांनी धाव घेत, कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. तसेच भाजप कार्यकर्त्यांना टी-शर्ट काढण्यास सांगितल्याने तणाव निवळला. पवननगर परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने, मविआ कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. याठिकाणी देखील शाब्दिक चकमक झाली होती. मात्र, पोलिसांनी मध्यस्थी करून वाद मिटवला.
पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक
सातपूर गावठाण परिसरात स्वराज्यचे उमेदवार दशरथ पाटील कार्यकर्त्यांसह आले असता, त्याठिकाणी आमदार सीमा हिरे यांचे सुपुत्र असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे पाटील आणि हिरे समर्थक आमने-सामने आले. दोन्हींकडून घोषणाबाजी केली गेल्याने, तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळीदेखील पोलिसांनी तत्काळ मध्यस्थी केल्याने तणाव निवळला.