भाजपने आपले पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री जाहीर केले आहेत.File Photo
Published on
:
05 Feb 2025, 6:00 am
Updated on
:
05 Feb 2025, 6:00 am
ठाणे : भाजपने आपले पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात संपर्कमंत्री जाहीर केले आहेत. शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक संपर्कमंत्र असतील तर रायगडचा पालकमंत्री कोण, याचा ठावठिकाणा लागला नसताना भाजपने आपले संपर्कमंत्री म्हणून नितेश राणेंना जबाबदारी दिली आहे. तरुण दमाचे राणे आता सिंधुदुर्गबरोबर रायगडही पाहणार आहे.
पंचाहत्तरीत असलेले गणेश नाईक भाजपचे तब्बल आठ आमदार असलेल्या ठाण्याची सुत्रे सांभाळणार आहेत. रत्नागिरीची जबाबदारी मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांच्याकडे देण्यात आली आहे.
तर मुंबई शहरची जबाबदारी मंगलप्रभात लोढांवर असणार आहे. कोकणातील एकूण सात जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्ग, पालघर, मुंबई उपनगर या तीन जिल्ह्यांचे पालकमंत्री भाजपचेच आहेत. उरलेल्या चार जिल्ह्यांसाठी भाजपने आपले चार ताकदवान मंत्री संपर्कमंत्री म्हणून दिले आहेत. त्यामुळे येत्या स्वराज्य संस्था निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली वसई विरार, पनवेल उल्हासनगर मीरा भाईंदर, भिवंडी या महापालिकांच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या जिल्हा परिषदेच्या आणि ५० पेक्षा जास्त न. प. च्या निवडणुका नजीकच्या काळात येउ घातल्या आहेत. या पार्श्वभूमिवर भाजप आपली ताकद आजमावण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात भाजपचे नितेश राणे आमदार आणि मंत्रीही आहेत. रत्नागिरीत भाजपचा एकही आमदार नाही. तो जिल्हा आता आशीष शेलार सांभाळणार आहेत. रायगडमध्ये भाजपचे तीन आमदार आहेत. ठाण्यात आठ आमदार आहेत. पालघरमध्ये तीन आमदार आहेत. तर मुंबई शहरमध्ये सात ते आठ आमदार तर मुंबई उपनगरमध्ये १२ ते १५ आमदार आहेत. त्यामुळे भाजपने कोकणात आपली ताकद वाढवण्यासाठी कंबर कसली आहे.