पनवेल शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. FILE
Published on
:
08 Feb 2025, 7:46 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:46 am
कोकणवासियांचे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून मोठ्या अभिमानाने पाहिल्या जात असलेल्या पनवेलनगरीचं रुपडं आता दिवंसेदिवस बदलत चाललंय, वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण,नवी मुंबई विमानतळ,मुंबई -बडोदा महामार्ग, जेएनपीए महामार्ग, नैना आदी विविध विकास प्रकल्पामुळे पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु झालेली आहे. ग्रामीण भागातही मोठ मोठे गृह प्रकल्प आकार घेत आहेत. त्यांच्या किंमती अव्वाच्या सव्वा असल्या तरी ग्राहकांकडूनही त्या गृह प्रकल्पांना मोठी मागणी आहे. नवीन गृह प्रकल्प उभारताना जुन्या प्रॉपर्टीवर बुलडोझर फिरविला जात आहे. यामुळे सध्या पनवेलनगरीला धुळीने गुरफटून टाकले आहे. याचा मोठा परिणाम पनवेलकरांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.यातून कधी सुटका होणार असाच यक्ष प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
पनवेलमध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर. आजही जुन्या पनवेलमध्ये अनेक वास्तू या ऐतिहासिक खुणा दाखविणार्या वास्तू साक्ष म्हणून उभ्या आहेत.पण त्या आता जुन्या, जीर्ण झाल्याने त्या पाडून तेथे नवीन टोलेजंग इमारती उभारण्याचा घाट घातला जात आहे. चौसोपी वाड्यांच्या जागी आता वन बीचके, टू, बीचके, थ्री बीचके सारखे फ्लॅट दिमाखात उभे राहत आहे.
नागरिकांना श्वसनाचा त्रास
या जुन्या वास्तू पाडताना उडणार्या धुळीचा त्रास पनवेलकरांना होताना दिसत आहे.धुळीचे लोटच्या लोट सर्वत्र उडत असताना वाहनचालकांना तोंडाला मास्क,डोक्याल हेल्मेट घालून येजा करावी लागत आहे.याचा सर्वाधिक त्रास बंदोबस्तासाठी असणा़र्या पोलीस यंत्रणेला होत असल्याने त्या विभागाला हे रोजचेच दुखणे होऊन बसले आहे.विशेष करुन धुळीचे कण नाका तोंडातून शरीरात जात असल्याने त्याचा मोठा त्रास श्वास घेताना घेतोय,मास्क लावून लावून कितीवेळ लावणार,असा प्रश्नच नियमित प्रवास करणार्यांना पडत आहे.मास्क बाजुला करुन मोकळा श्वास घ्यावा तर धुळीचे कण,वाहनांचे धूर याचा होणारा त्रास पोलिसांसह नागरिकांना नकोसा झालेला आहे.
विकसकांवर यंत्रणेचे निबर्र्ंध
ही विकासाची प्रक्रिया असल्याने त्यामध्ये हस्तक्षेपही कोणी करु शकत नाही.तरीही महापालिकेनेही जुन्या वास्तू पाडताना सभोवताली पत्र्यांचे शेड बांधण्याचे निर्बंध विकसकाना घातलेले आहेत.त्यामुळे काही प्रमाणात रस्त्यावर येणारी माती येणे कमी झालेले आहे.शिवाय धुळ जास्त उडू नये म्हणून कामाच्या ठिकाणी सातत्याने पाणी मारण्याचेही आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र वार्याने उठणारी धुळ कोणीही थोपवू शकत नसल्याने नागरिकही हैराण झाल्याचे दिसत आहेत.
पनवेल महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्पांसह विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. नागरिकांना त्याचा त्रास होताना दिसतोय. त्यासाठी नियमित मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे श्वसनाचा त्रास कमी जाणवेल. नागरिक, विकसकांनी पर्यावरण प्रेमी बनणे गरजेचे आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे.
- डॉ.आनंद गोसावी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पनवेल महापालिका