मानवत, सोनपेठ, गंगाखेड तालुक्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास होणार…
परभणी (Parbhani) : जिल्ह्याच्या राजकारणाला विकासाची गती मिळण्यास सुरुवात झाली असून गंगाखेड, सोनपेठ व मानवत या तीन तालुक्यातील 11 तीर्थक्षेत्रांचा क वर्गात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीने मंजूरी दिली आहे. पालकमंत्री ना. मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) आ. डॉ. रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) व आ. राजेश विटेकर (Rajesh Whitaker) यांनी घेतलेल्या या निर्णयाचे ग्रामीण भागात स्वागत होते आहे.
तीर्थक्षेत्रांना क वर्गाचा दर्जा देण्याचा निर्णय!
जिल्ह्याला हक्काचा पालकमंत्री (Guardian Minister) व नवीन निवडून दिलेले आमदार चांगले निर्णय घेतील अशी आशा जनतेमध्ये आहे. तसे नवनिर्वाचित सर्वच आमदार विकास करणार असे आश्वासन प्रत्येक सत्कार सोहळ्यात देत आहेत. पहिले पाऊल जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) आढावा बैठकीमध्ये नवीन 11 तीर्थक्षेत्रांना क वर्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील बडवणी येथील बेलीचा महादेव संस्थान, गोधनपुरी महाराज संस्थान, उंडेगाव येथील नाथ महादेव मंदिर, सोनपेठ तालुक्यातील करम येथील श्री करमेश्वर मंदिर देवस्थान, मानवत तालुक्यातील अंबेगाव येथील जागृत पुरातन हनुमान मंदिर, पाळोदी येथील जागृत पुरातन दक्षिणमुखी हनुमान मंदिर, रामे टाकळी येथील जागृत पुरातन रामेश्वर मंदिर, सावरगाव येथील पुरातन सावता माळी मंदिर, सावळी येथील पुरातन जागरुक महादेव मंदिर, केकरजवळा येथील जागरुक पुरातन तुळजाभवानी माता मंदिर तर कोथाळा येथील जागृत श्रीकृष्ण मंदिर व मानवत तालुक्यातील सावंगी मगर येथील पुरातन ऋषिकेश्वर महाराज मंदिर, रामचंद्र मंदिर समाधीस्थळ व महादेव मंदिराचा तीर्थक्षेत्र (Pilgrimage) विकासातील क वर्गात समावेश आहे. या मंदिरांचा तीर्थक्षेत्रात समावेश केल्यामुळे गावाचा व परिसराचा सुद्धा विकास करण्यासाठी निधी (Funds) उपलब्ध करण्यासाठी सोयीचे जाणार आहे.