जिल्ह्यात थंडीचा कमबॅक
परभणी (Parbhani) :- मध्यंतरी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे थंडीने जिल्ह्यातून काढता पाय घेतला होता. परिणामी उकाडा जाणवू लागला होता व किमान तापमान २० अंशावर पोहचले होते.
वातावरण झाले स्वच्छ असून थंडीचे जिल्ह्यात ‘कमबॅक’
मात्र आता वातावरण स्वच्छ झाले असून थंडीचे जिल्ह्यात ‘कमबॅक’ झाले आहे, तर पारा घसरला असून गुरुवार २३ जानेवारी रोजी जिल्ह्याचे किमान तापमान १४ अंशावर पोहचले आहे. गुलाबी थंडी परतून आल्यामुळे नागरिक थंडीचा आनंद घेत असताना थंडीने आता हुडहुडी वाढवली आहे. यंदा डिसेंबर महिन्याच्या, सुरुवातीला व पंधरवड्यापर्यंत थंडीने जिल्हावासीयांना चांगलीच हुडहुडी भरविली होती. विशेष म्हणजे, १५ डिसेंबर जिल्ह्याचे किमान तापमान ८. २ अंशावर आले होते. मात्र त्यानंतर हळूहळू थंडीचा जोर कमी झाला होता. मधेच ढगाळ वातावरण निर्माण होऊन त्यातच हवामान (weather) खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला होता. ढग दाटून आल्याने थंडीचा जोर कमी होऊन उकाडा वाढला होता. उकाड्यामुळे हिवाळ्यातही नागरिकांना पंखे चालवावे लागल्याचे दिसले.
२३ जानेवारी रोजी जिल्ह्याचे किमान तापमान १४ अंशावर
आता वातावरण स्वच्छ झाले असून मागील दोन-तीन दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. त्यातच पारा झपाट्याने घसरत असून गुरुवार २३ जानेवारी रोजी जिल्ह्याचे किमान तापमान (Temperature) १४ अंशावर आले होते. विशेष म्हणजे, आता थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे बोलले जात असून तशी स्थिती निर्माण होत आहे. थंडीचा जोर वाढल्यामुळे रस्त्यांवर रात्रीच्या सुमारास शुकशुकाट होत आहे.