परभणी (Parbhani) :- जिल्ह्यात भटक्या व मोकाट कुत्र्यांचा (Street Dogs)त्रास काही कमी होताना दिसत नाही. कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिक जखमी होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेल्यांची परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याकरिता रीघ सध्या पहावयास मिळत आहे. त्यामुळेच मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण (Vasectomy surgery) करण्याचे व त्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.
कुत्र्याने चावा घेतलेल्यांची रुग्णालयात रीघ…
सध्या जिल्ह्यात मोकाट तसेच पीसाळलेल्या कुत्र्यांनी उच्छाद घातलेले दिसून येत आहे. जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील येथील करंजी गावात सध्या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घातला असून गावातील एका वयोवृद्ध महिलेस कुत्र्याने अक्षरशः अंगावरील सर्वच भागास चावा घेत महिलेस मोठ्या प्रमाणावर जखमी केल्याची घटना मंगळवार २८ जानेवारी रोजी घडली होती. त्या महिलेवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.तसेच गावातील जवळपास २० ते २५ नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला.
कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे परभणी मनपासमोर आव्हान..!
तसेच जिंतूर तालुक्यातील बोरी ,सेलू, या गावात तसेच परभणीत पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांनी बऱ्याच जणांना चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत या गावातील कुत्र्यांनी चावा घेतलेले पेशंट सध्या परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत आहेत.. या सर्व गंभीर बाबीकडे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.