Published on
:
18 Nov 2024, 3:21 am
Updated on
:
18 Nov 2024, 3:21 am
काहींना वाटत असेल की अजित पवारांनी ‘साहेबां’ना सोडायला नको होतं. पण मी साहेबांना सोडलेलं नाही. साहेबांना सांगितलं होतं, सगळ्यांचं मत होतं की सरकारमध्ये जावं. कामांना ‘स्टे’ दिला होता. त्या सरकारने तो स्टे दिला होता. मी त्या वेळी विरोधी पक्षनेता होतो. पैसे दिले पण पुन्हा स्टे दिला. स्टे पण उठला पाहिजे.
वेळ जाऊन चालत नाही म्हणून आम्ही निर्णय घेतला होता, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षफुटीबाबत वक्तव्य केले आहे. तसेच पाच वर्षांत अडीच वर्षे सत्ता मिळाली. त्यानंतर देखील बारामतीसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचा दावा उपमुख्यमंत्री पवार यांनी केला. रविवारी (दि. 17) सकाळी त्यांनी बारामती तालुक्यातील ढाकाळे, माळेगाव खुर्द, कर्हावागज आदी गावांचा दौरा केला. या वेळी ते बोलत होते.
लोकसभेला तुम्ही मला चांगला झटका दिला. पण म्हणतात ना जोर... का झटका... धीरे से लगे... तसाच ‘जोर.. का झटका धीरे से लगा’; मात्र आता तसे काही होऊ देऊ नका. लोकसभेला तुम्ही जे केले तो तुमचा अधिकार होता, तो तुम्ही बजावला. मात्र, ही विधानसभेची निवडणूक आहे. मी तुमचा प्रतिनिधी आहे. गाव नेत्यांचा राग माझ्यावर काढू नका, अशी विनवणी अजित पवार यांनी बारामतीकरांना केली.