शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिररावfile
Published on
:
18 Nov 2024, 5:36 am
Updated on
:
18 Nov 2024, 5:36 am
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले असून, मतदारसंघातून मी पक्षाची उमेदवार आहे. मी लढणार अन् जिंकणारच, असा विश्वास शिंदे गटाच्या उमेदवार डॉ. राजश्री अहिरराव यांनी रविवारी (दि.१७) व्यक्त केला. देवळाली आणि शिवसेना हे अतूट नाते आहे. शिवसेनाप्रमुख आणि धनुष्यबाणाशी कोणत्याही परिस्थितीत गद्दारी करणार नाही, असे सांगत शिवसैनिकांनीही देवळालीमध्ये पक्षाचे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
देवळाली मतदारसंघामध्ये सोशल मीडियातून शनिवारी (दि. १६) पत्र व्हायरल करत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत डॉ. अहिरराव यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. त्या म्हणाल्या, सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या पत्रावर ८ नोव्हेंबर तारीख आहे. मग ते आजच व्हायरल का करण्यात आले? तसेच पत्राच्या सत्यतेवर शंका उपस्थित करताना त्यांनी हीच आपल्या विजयाची खरी नांदी असल्याची भावना व्यक्त केली. सोशल मीडियाद्वारे पक्ष असे पत्र देत नसते असे सांगत, याबद्दल पक्षाकडून कोणताही अधिकृत आदेश आला नसल्याचे अहिरराव यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपण संपर्कात असून प्रचारासंदर्भात ते माहिती जाणून घेतात, असा दावा अहिररावांनी केला. मतदारसंघात माझ्या प्रचाराचा झंझावात बघता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे जागा राखण्यासाठी विविध मार्गाने केविलवाणे प्रयत्न सुरू असून, त्याचाच हा भाग असल्याची टीका अहिरराव यांनी केली. शिवसेनाप्रमुखांचा आज स्मृतिदिन असून त्यांच्या स्मृतींना वंदन करून आजच्या प्रचाराचा प्रारंभ मी केला आहे. विरोधकांनी कितीही अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, तरी मी निवडणूक लढणारच, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांना पत्र व्हायरल करावे लागते, यामध्ये त्यांची हतबलता दिसते. शिवसैनिक हा आदेशावर चालतो. मुख्यमंत्र्यांचा आम्हाला आदेश असून, देवळालीत धनुष्यबाण जिंकणार. विरोधकांकडून जे षडयंत्र रचले जातेय, त्याविरोधात शिवसैनिकांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे व धनुष्यबाण यांच्याशी कार्यकर्ते गद्दारी करणार नाहीत.
-विक्रम सोनवणे, भगूर शहरप्रमुख, शिवसेना शिंदे गट
आमचे पत्र राष्ट्रवादीचे नेते व्हायरल करतात. पण मुख्यमंत्र्यांकडून कोणताही आदेश आलेला नाही. शिवसैनिक पेटून उठला असून, हे रणांगण तो सोडणार नाही. आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणाचेच काम करणार आहोत, यात शंका नाही.
लकी ढोकणे, तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट