Published on
:
18 Nov 2024, 7:20 am
Updated on
:
18 Nov 2024, 7:20 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉलेजमध्ये सिनिअर (वरिष्ठ) विद्यार्थ्यांकडून ज्युनिअर (कनिष्ठ) विद्यार्थ्यांवर होणारे रॅगिंगच्या घटना म्हणजे निव्वळ विकृती असून, यावर केंद्र, राज्य सरकारसह सर्वोच्च न्यायालयाने वारंवार गंभीर चिंता व्यक्त केली आहे. तसेच अनेक उपायही सूचवले आहेत. मात्र तरीही दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्षात रॅगिंगच्या विकृतीच्या बळी पडणार्या विद्यार्थी समोर येतातच. (Ragging in college ) रॅगिंगमुळे आणखी एक बळी गेल्याचा प्रकार गुजरातमधील धारपूर मेडिकल कॉलेजमध्ये घडला आहे. येथे एमबीबीएसच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याचा रॅगिंगवेळी तासनतास उभे राहण्यास भाग पाडल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मेडिकल कॉलेजच्या १५ सिनिअर विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे.
अनिल मेथनिया या विद्यार्थ्याने गुजरातच्या धारपूर मेडिकल कॉलेजमधील प्रथम वर्षाला प्रवेश घेतला होता. सिनिअर विद्यार्थ्यांनी रविवारी रात्री रॅगिंगचा भाग म्हणून त्याला सलग उभे राहण्यास सांगितले. तो सलग तीन तास तो उभा राहिला. अखेर अनिल जागीच कोसळला.त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अमानूष वागणूक दिल्यानेच अनिलचा मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
मेडिकल कॉलेजमधील सिनिअर विद्यार्थ्यांनी केलेल्या रॅगिंगमुळेच अनिलचा मृत्यू झाला आहे. यावेळी प्रथम वर्षाचे सर्व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अनिल मेथनिया याला अमानूषपणे सलग तीन तास उभे केले गेले. हा ताण असहाय्य झाल्याने अनिलचा मृत्यू झाला. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आता कडक कारवाईची मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे. दरम्यान, धारपूर मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता (डीन_ हार्दिक शाह यांनी पुष्टी केली की, सलग उभे राहिल्यामुळे अनिल कोसळला. त्याला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही शाह यांनी सांगितले.
मेडिकल कॉलेजच्या १५ सिनिअर विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल, कॉलेजमधूनही निलंबित
या प्रकरणी माहिती देताना सिद्धपूरचे पोलीस उपअधीक्षक केके पंड्या यांनी सांगितले की, मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १७४ नुसार अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणचा तपास सुरु आहे. तसेच मेडिकल कॉलेजच्या १५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी, अनिल मेथनिया यांच्यासह प्रथम वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना शनिवारी रात्री वसतिगृहाच्या खोलीत तीन तासांपेक्षा जास्त काळ उभे केले. त्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ केला, असे पोलिसांनी दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे.मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या प्रशासनाने स्पष्ट केली आहे. संशयित आरोपी विद्यार्थ्यांना पुढील आदेश येईपर्यंत त्यांच्या वसतिगृह आणि शैक्षणिक वर्षातून निलंबित करण्यात आले आहे.