तालुक्यात पुरोगामी विचार जपला असून सर्वांना सोबत घेऊन काम केले. मात्र काही लोक येऊन दडपशाही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. धांदरफळमध्ये त्यांच्या उपस्थितीत केलेले बेताल वक्तव्य लांछनास्पद आहे. तालुक्यातून दहशत निर्माण करणारे, समोरचा उमेदवार आणि त्याचे पाठीराखे हे सत्तेसाठी कोलांटउड्या मारणारे आहेत, त्यांना त्याची जागा दाखवा, असे आवाहन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
धांदरफळ बुद्रुक येथील प्रचारसभेत ते बोलत होते. डॉ. जयश्री थोरात, विक्रम खताळ उपस्थित होते. आ. थोरात म्हणाले, राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या संधीचा उपयोग हा तालुक्याच्या विकासासाठी केला. मात्र आता येथे काही लोक येऊन दडपशाही निर्माण करू पाहत आहेत. याकरता त्यांनी बगलबच्चे सांभाळले आहेत. हे खबरे खर्या अर्थाने तालुक्याच्या विकासात अडचणी निर्माण करत आहेत. या खबर्यांचे एक तरी योगदान दाखवा.
धांदरफळमध्ये केलेले वक्तव्य हे समस्त महिला भगिनींचा अपमान करणारे आहे. जेव्हा जेव्हा तालुक्याच्या अस्मितेला ठेच लावण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तालुका पेटून उठतो याचा अनुभव आता त्यांनी घेतला आहे.पुढील पन्नास वर्षात कोणी वाईट बोलण्याची हिंमत करणार नाही, असे ते म्हणाले.