आगीच्या ज्वाळांमधून दुसऱ्यांच्या मुलांना वाचवलं; पण स्वत:च्या जुळ्या मुलींना गमावलंfile photo
Published on
:
18 Nov 2024, 5:44 am
Updated on
:
18 Nov 2024, 5:44 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : झाशी मेडिकल कॉलेजच्या इन्फंट वॉर्डमध्ये लागलेल्या भीषण आगीत नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या आगीतून निष्पाप मुलांना वाचवण्यासाठी अनेकांनी जीव धोक्यात घातला होता. हमीरपूरचा रहिवासी असलेला याकूब हा देखील त्यापैकीच एक होता, जो आगीचे लोट आणि धुरातून वॉर्डात घुसला आणि खिडकीतून एक एक करून अनेक नवजात बालकांना बाहेर काढले. दुसऱ्या दिवशी ही बातमी पसरताच लोकांना याकुबचा अभिमान वाटू लागला, पण याकुबच्या जुळ्या मुलींना हा अभिमान कधीच जाणवू शकणार नाही, त्यांना त्यांच्या वडिलाच्या शौर्याची कहाणी ऐकायला मिळणार नाही. कारण, ज्या वेळी याकुब जळत्या वॉर्डच्या एका टोकातून मुलांना बाहेर काढत होता, त्याचवेळी दुसऱ्या टोकाला त्याच्या जुळ्या मुली आगीच्या भक्ष्यस्थानी होत्या.
हातगाडीवर उदरनिर्वाह करणाऱ्या हमीरपूरमधील सिकंदरपुरा परिसरातील याकूबची पत्नी नजमा हिने ९ नोव्हेंबर रोजी झाशी येथे जुळ्या मुलींना जन्म दिला. कुटुंबात आनंद शिगेला पोहोचला होता. मुलींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांनी त्यांना उपचारासाठी झाशी येथे आणले. गेल्या आठ दिवसांपासून या मुलींना येथे दाखल करण्यात आले होते. याकुबने सांगितले की, शुक्रवारी रात्री तो वॉर्डाबाहेर झोपला होता. अचानक त्यांना मोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला आणि तो उठला. वॉर्डाच्या खिडकीतून लोक बाहेर येत असल्याचे पाहिले. आत आग आणि धुराचे लोट होते. याकुबने खिडकी तोडून वॉर्डामध्ये प्रवेश केला. त्याने आई बिल्किस आणि मेव्हणी राणू यांच्यासोबत एक एक करून सात मुलांना बाहेर काढले. मात्र त्याच्या स्वत:च्या दोन मुली त्यात नव्हत्या.
यानंतर याकुब आणि नजमा दिवसभर हॉस्पिटलमध्ये भटकत राहिले. त्यांनी मुलींचा प्रत्येक कोपऱ्यात शोध घेतला. दोघेही एकमेकांचे हात धरून अश्रू पुसत राहिले. पण दुसऱ्या दिवशी शनिवारी दोन्ही मुलींच्या मृतदेहाची ओळख पटल्यावर काळाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. ही बातमी कळताच नजमा बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासून तिची प्रकृती अस्वस्थ आहे. आठ दिवसात नजमाला आपल्या जुळ्या मुलींचे चेहरेही नीट पाहता आले नाहीत. असे म्हणत याकुब रडायला लागला. आपण अनेक मुलांचे प्राण वाचवले, पण आपल्या मुलींना वाचवू शकलो नाही. श्वासोच्छवासाच्या त्रास होत असल्याने उपचार घेण्यासाठी मुलींना आणले होते, मात्र येथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला, असे तो रडत सांगत होता.