- लेखक: प्रकाश पोहरे
प्रयागराजमध्ये ( Prayagraj) प्रत्येक ठिकाणी खांद्यावर सामान घेऊन संगमाकडे जात असलेले भक्त (?) की अंधभक्त , सुरक्षा कर्मचारी आणि सफाई कामगार दिसत आहेत… कुंभ सोहळ्यात कुंभस्नानासाठी म्हणे मोक्षाचे दरवाजे उघडतात, असे म्हणणारे सोशल मीडिया (Social media) च्या विद्यापीठातील काही लोकं दिसतील..पण स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या अंधभक्तांना गर्दीत चेंगरून मरावे लागले. प्रयागतीर्थी कुंभमेळ्यात शंभराचे वर भाविकांचा मृत्यू झाला तसा देशातील लोकशाहीचाही प्रयागतीर्थी मृत्यू झाला व मृत्यूस कारण ठरलेले अमृतस्नान करून दिल्लीस पोहोचले. जनता मात्र तुडवून तुडवून मारली जात आहे.
कुंभमेळ्यात (Kumbh Mela) जे नागा साधू येतात, ते नेमके कुठून येतात, याचा कोणाला काहीच थांगपत्ता नसतो. विवस्त्र राहाणे, सर्वांगाला भस्म लावणे, नाचणे-गाणे, डमरू-डफली वाजवत शंकनाद करताना हे नागा साधू दिसतात. मात्र, कुंभमेळ्यात सहभागी होण्यापूर्वी हे नागा साधू कुठे राहातात, काय खातात, काय पितात आणि कुंभमेळा संपल्यानंतर कुठे निघून जातात, याविषयी कोणालाच काही माहीत नसते आणि याचा शोध कुणीही घेत नाही. कुणी तसे करू पाहिल्यास धर्मद्रोही म्हणून हिणविणारेही टपलेलेच असतात… मुळातच, कुंभमेळा हा भटांचा आणि भोंदूंचा, पाखंडींचा पर्वणी मेळा असतो, असे जगद्गुरु तुकाराम महाराजांचे परखड मत होते. कुंभमेळ्याला जाऊन आंघोळ करणं, केस कापणे, यात कसला आलाय धर्म? हा तर मूर्खांचा बाजार आहे. असे क्रांतिकारक आणि परखड मत तुकाराम महाराजांनी (Tukaram Maharaj’s)
एका अभंगाद्वारे व्यक्त केले आहे…
- आली सिंहस्थ पर्वणी।
न्हाव्या भटा झाली धनी।।
अंतरी पापाची कोडी।
वरी वरी बोडी दाढी।।
बोडीले ते निघाले ।
नाही पालटले अवगुण।।
पाप गेल्याची काय खूण।
तुका म्हणे अवघा सीन।।’’
हे सगळे जटाधारी, भगवी लंगोट नेसून आलेले (पण कुंभमेळ्यात नग्न होऊन स्नान करणारे), भस्म लावणारे आणि स्वतःला साधू म्हणवून घेणाऱ्यांना वं. रा. तुकडोजी महाराजांनी(Tukaram Maharaj’s) देखील याच शब्दांत झोडपलेले आहे…
- * ‘‘जंगलच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा।
* पारधी लंगोटी नेसून साधु दिसे मोठा।।
* कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा।
* गाढवाच्या अंगा नाही भस्माचा तोटा।।
* साधु अशाने साधु होत नाही रे।
* साधु बाजारचा भाजीपाला नाही रे।।’’
मात्र, लोकांनी आपले संत साहित्य ना अभ्यासले, ना आपले संत समजून घेतले…बसलेत लोकं कुंभमेळ्यातील साधूंचे दर्शन घेत आणि आपले जीव देत…
प्रयागराज ( Prayagraj ) महाकुंभ मेळ्यात अखेर भयंकर दुर्घटना घडलीच. चेंगराचेंगरीत ३० भाविकांचे बळी गेले. अर्थात ३० हा आकडा खोटा असून प्रत्यक्षात शंभरावर बळी गेल्याचा आंखो देखा हाल अनेक गोदी मीडियावालेच दाखवत आहेत. हे सर्व घडल्यावर पंतप्रधान मोदी (Prime Minister Modi) परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत म्हणे.. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज ( Uttar Pradesh Chief Minister Yogi Maharaj) परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगत आहेत, पण जमिनीवरची हकिकत वेगळी आहे. शंभराच्यावर बळी गेले व अनेक श्रद्धाळू बेपत्ता झाले आहेत. त्यांचे आप्त बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेत फिरत आहेत. हे सर्व लोक बेपत्ता झाले याचा काय अर्थ घ्यायचा? की त्यांची प्रेत रफादफा केलीत?
कुंभमेळा ही श्रद्धा (Shraddha)आहे व कुंभमेळ्यातील मौनी अमावास्येला गंगास्नान केल्याने स्वर्गप्राप्ती होते या अंधश्रद्धेतून मंगळवारी मध्यरात्री प्रयागतीर्थी गर्दी वाढली. म्हणूनच या अंधश्रद्धेवर प्रहार करताना जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवकल्पना जशी धुडकावली तशीच तीर्थक्षेत्रांची महतीही स्पष्ट शब्दात नाकारून आपले पुरोगामित्त्व सिद्ध केले आहे. महाराज तीर्थक्षेत्रावर प्रेम करणाऱ्याला विचारतात…
- * ‘जाऊनिया तीर्था तुवा काय केले ?।
* चर्म प्रक्षळिले वरी वरी ।।
* अंतरीचे शुद्ध कासयाने झाले ।
* भूषण त्वा केले आपणया।।'( अर्थात पवित्र (?) स्नान करून तरी काही साध्य झाले काय? तीर्थ नावाच्या पाण्यात डुबकी मारणाऱ्याची कातडी धुतली गेली पण त्यामुळे मन शुद्ध झाले काय ?) खरे तर मनःशुद्धी, चित्तशुद्धी झाली पाहिजे. तीर्थात स्नान करून केलेली पापे धुवून जात नाहीत. आचरणशुद्धी हाच जीवन पवित्र करण्याचा एकमेव उपाय आहे. ती साध्य करा असे तुकोबा म्हणतात. गेल्या काही दिवसांपासून त्रिवेणी संगमावर स्वर्गप्राप्तीच्या स्नानासाठी प्रचंड संख्येने लोक आले. त्या गर्दीमुळे बॅरिकेड्स तुटून गर्दीचे लोंढे एकमेकांना चिरडत पुढे गेले. लोक चिरडले गेले व त्यांना वाचविण्याची कोणतीही व्यवस्था प्रयागतीर्थी नव्हती. मग कुंभ सोहळ्यासाठी सात हजार कोटींची किंवा त्याहीपेक्षा जास्त, जी आर्थिक तरतूद केली आहे, त्या पैशाला नक्की कोठे पाय फुटले? याचे उत्तर पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देतील काय..? मग कुंभ धर्मसोहळ्याची व्यवस्था पाहणाऱ्या लोकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का होऊ नये? पण तसे होत नाही, कारण ते तर कुंभमेळा भरविणारे देवदूतच..!प्रयागराज ( Prayagraj ) येथे काय ते नागडे लोकं, त्यांना पोलीस संरक्षण, त्यांचा काय तो रुबाब…..
‘‘गांडू भडवे रण चढे, मर्दोंके बेहाल ।
पतिव्रता भूखन मरे, पेढे खाये छिन्नाल ||’’
असे संत कबीर म्हणतात.. आजच्या प्रसंगासाठी अगदीच चपखल लागू होतो हा दोहा..सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता लोकशाही विचारमूल्यांचा होणारा संकोच स्पष्टपणे जाणवतोय. हुकूमशाहीचा अदृश्य वावर जाणवतोय. बहुमताच्या नावाखाली गुप्त योजनांना कायद्याचा आधार घेत कार्यान्वित करण्याचा उघड उघड प्रयत्न होतांना आपण पाहत आहोत. सामान्य जनतेचा, शेतकऱ्यांचा, कामगारांचा, शेतमजुरांचा आवाज अधिकाधिक क्षीण करण्याचे सर्वाधिक प्रयत्न याच काळात होताहेत. स्वार्थासाठी शासकीय यंत्रणांचा गैरवापर करत नैतिकतेची किमान पातळीही सोडल्या जातेय. श्रमिक, शेतकऱ्यांचं शोषण होतंय. सामाजिक एकोपा, राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललंय. या अशा परिस्थितीत कुंभमेळ्याने हे सगळे विषय दाबून टाकले आणि मीडियावर, सोशल मीडियावर, गावातील लोकांमध्ये, सगळीकडे एकच चर्चा, ती म्हणजे ‘कुंभमेळा’…
सनातन्यांच्या वर्चस्वातून समाज मुक्त व्हावा, या हेतूने जगद्गुरु तुकाराम महाराजांनी (Tukaram Maharaj’s ) वैदिक धर्म निर्मित व्यवस्थेवर कडाडून हल्ला केला होता ..
- * ‘‘ऐसें कैसे झाले भोंदू।
* कर्म करुनि म्हणती साधू।।
* अंगा लावुनिया राख।
* डोळे झाकुनि करिती पाप।।
* दावी वैराग्याची कळा।
* भोगी विषयांचा सोहळा।।
* तुका म्हणे सांगो किती।
* जळो तयांची संगती।।’’
या भोंदूंची संगत सोडा, हे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी निक्षून सांगितले होते, मात्र, आज स्वतःस वारकरी म्हणवून घेणारे हे समजू शकत नसतील तर हा चिंतेचा विषय आहे.
कुंभमेळ्यात ‘व्हीव्हीआयपी’ संस्कृतीचा बोलबाला आहे. राजनाथ सिंह, (Rajnath Singh, ) अमित शहा (Amit Shah )यांसारखे अतिसुरक्षा व्यवस्था असलेले लोक संगमावर डुबकी मारण्यासाठी पोहोचतात तेव्हा दिवसभर आठ-दहा किलोमीटरचा परिसर श्रद्धाळूंसाठी बंद केला जातो. त्यामुळे गर्दी वाढतच जाते. कुंभ सोहळ्यात मंत्री – जंत्री, उद्योगपती यांच्या कुंभस्नानासाठी प्रशासन चार-चार दिवस राबत असते. त्यांच्यासाठी सर्व काही राखीव. कोणताही ओरखडा न उठता त्यांचे शाही-स्नान होते व मोक्षाचे(?) दरवाजेही उघडतात, पण स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचण्यासाठी धडपडणाऱ्या श्रद्धाळूंना गर्दीत चेंगरून मरावे लागते. इतक्या मोठ्या आयोजनात अशा छोट्या-मोठ्या दुर्घटना घडतच असतात, असे योगी सरकारातले ‘भाजप’ मंत्री संजय निषाद सांगतात, ही केवढी बद्तमिजी म्हणावी..! शंभराचेवर लोक तुडवून मारले ही ज्यांना सामान्य घटना वाटते असे लोक हिंदुत्वाची ध्वजा हाती घेऊन उभे राहणार?
हे शतप्रतिशत सत्य आहे की, सांप्रदायिक शक्ती आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात केंद्रस्थानी उभी आहे. थोडक्यात, याचा अर्थ सनातन ब्राह्मणी संस्कृती, या देशात पुन्हा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि कुंभमेळा हा त्याचाच एक कार्यक्रम आहे.
‘ कुंभ’स्नानाने गरीब अधिक श्रीमंत होत आहेत याउलट घोटाळे करून निवडून येणारे व सत्ता राबविणारे तडीपार, चोर, दरोडेखोर, कुंभमेळ्यात स्नान करतात. देशातील लोकशाहीचाही प्रयागतीर्थी मृत्यू झाला व मृत्यूस कारण ठरलेले अमृतस्नान करून दिल्लीस पोहोचले. जनता मात्र तुडवून तुडवून मारली जात आहे. त्यामुळे मोक्ष कुणाला मिळाला? हा प्रश्नच आहे!
एकीकडे असे तर दुसरीकडे सरकारने दाखविलेल्या चुकीच्या मार्गाने गेल्यामुळे महाराष्ट्रात जो शेतकरी आत्महत्या ( A husbandman who commits termination successful Maharashtra )करत आहे त्याला महाराष्ट्र सरकार केवळ एक लाख रुपये ते सुद्धा अनेक (फालतू ?)चौकश्या करून आणि त्यातील बहुतेकांना बाद करून एक लाख कसे तरी देतात, केंद्र सरकार तर छदाम देत नाही तर दुसरीकडे कुंभमेळ्यात मोक्ष प्राप्ती(?) मिळालेल्यांना मात्र 25 लाख रुपये उत्तर प्रदेश सरकार देत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एवढाच संदेश द्यावासा वाटतो की उगाच इथे आत्महत्या केल्यापेक्षा कुंभमेळ्यात जा आणि तिथे दंगामस्ती करून मोक्ष मिळवा म्हणजे किमान पंचवीस लाख मिळून तुमच्या वरील कर्ज आणि कुटुंबाचे दारिद्र्य तरी दूर होईल. कसा वाटला सल्ला?
————————————————–
प्रहार : रविवार दि. 2 फेब्रुवारी 2025
लेखक : प्रकाश पोहरे,
संपादक, दैनिक देशोन्नती, दैनिक राष्ट्रप्रकाश, साप्ताहिक कृषकोन्नती
————————————————–
लेखक: प्रकाश पोहरे
प्रतिक्रिया देण्यासाठी 98225 93921 वर ‘थेट प्रकाश पोहरेंना संपर्क करा किंवा आपल्या प्रतिक्रिया याच व्हॉट्सअप वर पाठवा.’ प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहायला विसरू नका.