अपहरणानंतर तासाभरात ठेकेदाराच्या मृतदेहाचे तुकडे; मुख्य सूत्रधार अद्याप फरार, तिघांना बेड्याFile Photo
Published on
:
18 Nov 2024, 2:39 am
Updated on
:
18 Nov 2024, 2:39 am
Pune: मॉर्निंग वॉकला गेलेल्या विठ्ठल पोळेकर यांना ’मामा चला, जरा तुमच्याकडे काम आहे,’ असे म्हणत त्यांना कारमध्ये बसविले आणि खडकवासला धरणाच्या बॅक वॉटरमधील ओसाडे गावाजवळ घेऊन गेले. अपहरण करून चौघांनी तासाभरातच त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते खडकवासला बॅक वॉटरमधील पाण्यात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तिघांना अटक केली, तर मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहे.
विठ्ठल सखाराम पोळेकर (वय 70) असे खून झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे. शुभम पोपट सोनवणे (वय 24), मिलिंद देविदास थोरात (वय 24) आणि रोहित किसन भामे (वय 22), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबू किसन भामे हा फरार असून, त्याच्यावर 9 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे आदींचा समावेश असल्याचे पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.
विठ्ठल पोळेकर हे शासकीय ठेकेदार असून, त्यांनी पायगुडेवाडी ते गोळेवाडी रस्त्याच्या कामाचा ठेका घेतला होता. या कामात कोणताही अडथळा करू नये म्हणून योगेश भामे याने त्यांच्याकडे खंडणी म्हणून एक जॅग्वार कार मागितली होती. त्याची पूर्तता न केल्याने त्याने विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खून करण्याची धमकी दिली होती. मॉर्निंग वॉकला गेलेले विठ्ठल
अपहरणानंतर तासाभरात ठेकेदाराच्या मृतदेहाचे तुकडे
पोळेकर हे परत न आल्याने अगोदर मिसिंग व त्यानंतर अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोळेकर यांच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ते गेल्यानंतर त्यांच्या मागोमाग एक स्विफ्ट कार जाताना दिसली. ती गणेश मुरलीधर चोरमले यांची असून, सध्या योगेश भामे वापरत असल्याची माहिती मिळाली.
योगेश भामे हा घरी नसल्याने व त्याचा मोबाईल बंद असल्याने त्यानेच अपहरण केल्याचा संशय निर्माण झाला. त्याचा भाऊ रोहित भामे याला पोलिसांनी अटक केली. या कारचा शोध घेतला असता ती नाशिकच्या दिशेने गेली असून, योगेश भामे हा गाडी चालवत असल्याचे समजले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर व त्यांचे सहकारी नाशिकला रवाना झाले. नाशिकमध्ये शोध घेतल्यावर संशयित आरोपी हे रेल्वेने जबलपूरकडे गेल्याचे समजले. जबलपूर लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने शुभम व मिलिंद यांना पकडण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
दरम्यान, विठ्ठल पोळेकर यांचा शोध घेण्यात येत होता. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी सांगितले की, दोघांना पकडल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना बॅक वॉटरला नेऊन मारण्यात आले व त्यांचे अवयव पाण्यात टाकण्यात आल्याचे आरोपींनी सांगितले. आरोपींच्या सांगण्यावरून शोध सुरू केला. त्यांच्याशी व्हिडीओ कॉलवर संभाषण करून माहिती घेतली.
ड्रोनद्वारे व नावेतून त्यांचा शोध घेतल्यानंतर विठ्ठल पोळेकर यांच्या मृतदेहाचे काही अवयव पोलिसांना मिळाले आहेत. मात्र, शिर अद्याप मिळालेले नाही. अतिशय निर्घृणपणे त्यांचा खून केल्याचे दिसून येत आहे. खंडणीव्यतिरिक्त अन्य कारणांचा शोध घेण्यात येत आहे. अपहरण केल्यानंतर तासाभरात त्यांचा खून करण्यात आला. खंडणीशिवाय आणखी काही कारणे त्यामागे आहेत का? याचा शोध घेतला जात आहे.
तक्रारीची चौकशी करणार
विधानसभा निवडणुका सुरू असताना ठेकेदाराचे अपहरण झाल्याचे समोर येताच कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबत तत्काळ तपासाचे आदेश दिले होते. त्यांनी घटनास्थळी भेट देखील दिली होती. दरम्यान, ठेकेदाराचा खून नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला, याचा पोलिस तपास करत असल्याचे फुलारी यांनी सांगितले.
कारण वेगळेच असण्याची शक्यता
आरोपींनी मंगळवारी पोळेकर आणि त्यांच्या मुलाकडे जॅग्वार गाडी किंवा दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र, त्यांचे अपहण केल्यावर घरच्यांकडे पैशांची कोणतीच मागणी केली नाही. तसेच त्यांचा खून ज्या क्रूरपणे केला आहे ते पाहता खंडणी हे कारण त्यामागे नसावे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
योगेश भामेने रचला अपहरणाचा कट
आरोपी शुभम आणि मिलिंद डोणजे परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत. योगेश भामेने त्यांना पैशाचे आमिष दाखवून अपहरणाचा कट रचला. पोळेकर मॉर्निंग वॉकला गेल्यावर त्यांना ’मामा एक काम आहे,’ असे म्हणत गाडीत बसविले. त्यांच्याबरोबर गाडीत काही वेळ वादावादी झाल्यावर धरणाच्या बॅक वॉटरला नेत त्यांचा खून करण्यात आला.
हॉटेलमधील कामगारांना घेतले हाताशी
योगेश भामे हा ग्रॉमपंचायत सदस्य असून, त्याची पत्नी यापूर्वी सरपंच होती. त्यामुळे गावात येणार्यांवर तो छाप पाडत असे. त्यातूनच त्याने डोणजे येथील पतंजली हॉटेलमध्ये काम करणार्या शुभम व मिलिंद यांना हाताशी धरले. शुभम सोनवणे याच्यावर खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे, असे दोन गुन्हे दाखल आहेत.