पुण्यात मागच्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम म्हणजे जीबीएस आजाराने दहशत निर्माण केली आहे. या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढली, काही रुग्णांचा मृत्यू झाला. आता GBS आजारावरील उपचारांबाबत एक चांगली बातमी आहे. त्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णांच मनोबल वाढू शकतं. पुण्यात या आजाराचे 149 संशयित रुग्ण आढळून आले. तीन संशयित रुग्णांचा मृत्यू देखील झाला. यामुळे शहरात चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं.
मात्र, असं असलं तरी आज पुण्यातील ससून रुग्णालय येथे गुलेन बारी सिंड्रोम जीबीएस आजाराच्या पाच रुग्णांना एकत्रित डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णांना फुलांचा पुष्पगुच्छ देत, पेढे भरवत डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी या रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.
मोफत उपचार
पुण्यातील ससून रुग्णालयात जीबीएस आजाराचे 28 रुग्ण आहेत. आज डिस्चार्ज मिळालेल्या पाच रुग्णांना ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी अधीक्षक डॉ.यलप्पा जाधव, डॉ.रोहिदास बोरसे, डॉ. एच.बी.प्रसाद हे उपस्थित होते. ससूनमध्ये उपचार घेणाऱ्या GBS रुग्णांना मोफत उपचार देण्यात येत आहे. यावेळी रुग्ण तसेच रुग्णाच्या नातेवाईकांच्या चेहेऱ्यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.
पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे पहिला मृत्यू
शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये जीबीएसमुळे एका 36 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला होता. तो पिंपळे गुरवचा रहिवाशी होता. उपचारासाठी आणलं, तेंव्हापासूनचं तो रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. पिंपरी-चिंचवडमधील जीबीएसमुळे झालेला हा पहिला मृत्यू होता. ज्या तरुणाचा मृत्यू झाला, तो ओला-उबेर चालक होता. टॅक्सी चालक असल्याने कोणत्या परिसरातील पाणी प्यायल्याने जीबीएसची लागण झाली, हे कळू शकलं नाही.
हा आजार कशामुळे होतो?
त्याआधी पुण्याच्या ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका 56 वर्षीय महिलेचा ‘जीबीएस’ने मृत्यू झाला होता. या आजारामुळे झालेला हा दुसरा मृत्यू होता. या महिला नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) नांदोशी येथील रहिवासी होत्या. गुइलेन बॅरे सिंड्रोम हा दूषित पाण्यामुळे होणारा आजार आहे. जीबीएस रुग्णांची संख्या वाढल्याने आरोग्य विभागाकडून पुण्यात पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासले जात आहेत.