केंद्र सरकारडून मध्यमवर्गीयांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न आहे अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच हे देशाचं बजेट नसून निवडणुकीचं बजेट आहे असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुबंईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, हा बजेट म्हणजे अत्यानंद, लोकांनी उड्या मारावं असं काही नाही. हे भाजपचेच भक्त उड्या मारत आहे. प्रत्येकाने आपापल्या परीने या अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले आहे. कालच्या निवडणुकीत मध्यमवर्गीयांची मतं भाजपला पडलेली नाहीत. ईव्हीएमच्या माध्यमातून मध्यमवर्गीयांची जी मतं चोरली, आणि ज्यामुळे मध्यमवर्गीय जो धक्क्यात आहे, त्या मध्यमवर्गीयांना मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न आहे. प्रत्यक्षात या कागदावरच्या बजेटमधून लोकांना काय मिळतं काय नाही मिळत यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. आता जे अर्थतज्ज्ञ आहेत त्यांची भाषणं ऐकायची आहेत. प्रत्यक्षात काय होईल यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल असे संजय राऊत म्हणाले.
तसेच बिहारच्या तुलनेत महाराष्ट्रासारख्या राज्याला काय मिळालं? मोदींचं प्रत्येक बजेट हे राज्याच्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केलेलं असतं. भविष्यात बिहारमध्ये निवडणूक आहे, बिहारवर वर्षाव. जिथे भाजपचं राज्य नाही, मग तमिळनाडू असेल, केरळ असेल किंवा कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल तिथे तोंडाला पानं पुसायची आणि पुढे जायचं. आणि भाजपचे जे अंधभक्त आहेत ते टाळ वाजवत बसतात असेही संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना बजेट कळालेलंच नाही. बजेट कळायला किमान 72 तास जावे लागतात. देशाचं बजेट फक्त आकडे आणि घोषणांवर चालत नाही. आम्हाला बजेट कळायला नानी पालखीवाला यांचं भाषण ऐकायला जावं लागत होतं. वानखेडे स्टेडियमवर त्यांचं भाषण आम्ही ऐकायचं तेव्हा आम्हाला ते बजेट कळायचं. हे काय चिंतामणराव देशमुख की रघुराम राजन आहेत का सगळे? असेही संजय राऊत म्हणाले.
हे लोक ट्रम्पला घाबरतात, ट्रम्प म्हणेल ते करावं लागणार. मोदींचं सरकार हे व्यपाऱ्यांचं सरकार आहे असेही संजय राऊत यांनी नमूद केले.