Published on
:
02 Feb 2025, 5:09 am
Updated on
:
02 Feb 2025, 5:09 am
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि अचूक उत्तरपत्रिका देण्याचे आमिष दाखवून तब्बल 40 लाख रुपयांची मागणी करणार्या दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक 2 ने अटक केली.
दीपक गायधने (26) आणि सुमीत जाधव (23) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्याचा एक साथीदार योगेश वाघमारे याला नागपूर येथून ताब्यात घेण्यात आले, तर इतर दोघांना चाकण एमआयडी येथून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीमध्ये अटक करण्यात आलेल्या गायधने आणि जाधव यांना वाघमारे याने 24 उमेदवारांची यादी दिली होती. त्या यादीमधील नांदगाव येथील दोन विद्यार्थ्यांना त्यांनी फोन कॉल करून प्रश्नपत्रिका व अन्सर कीचे आमिष दाखविले होते. ते देण्यासाठी त्यांनी 40 लाख रुपये मागितले.
40 लाखांच्या बदल्यात परीक्षेच्या आदल्या दिवशी ती प्रश्नपत्रिका आणि अचूक उत्तरपत्रिका देण्याचे आमिष दाखवून अफवा पसरवली होती. मात्र, त्यांच्याकडे तसे कोणतेही साहित्य आढळून आले नसून, केवळ लुबाडण्याच्या हेतूने बनाव केल्याचे उघडकीस आले.
मात्र, 24 उमेदवारांची यादी आरोपींनी कशी मिळवली, याचा पोलीस तपास करत असल्याचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले. ही कारवाई खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंजीर, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, प्रशांत शिंदे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे, मयूर भोकरे यांच्या पथकाने केली.