टीम इंडियाचा ऑलराउंडर आर अश्विन याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तडकाफडकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला. अश्विनने अशाप्रकारे घेतलेल्या निवृत्तीमुळे त्याला निरोपही देता आला नाही. अश्विन आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. खेळाडूंना सामन्यांमुळे कुटुंबाना आणि इतर गोष्टी करण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र निवृत्तीनंतर खेळाडूंच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल होतो. अश्विनचंही तसंच झालंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. बीसीसीआयकडून मुंबईत नमन अवॉर्ड शोचं आयोजन करण्यात आलं होतं. अश्विनने या कार्यक्रमात निवृत्तीबाबत आणि निवृत्तीनंतर कसं काय चाललंय? याबाबत सांगितलं.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बीसीसीआयच्या नमन अवॉर्ड शोमध्ये अनेक दिग्गज पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंचा सन्मान करण्यात आला. सचिन तेंडुलकर याला सी के नायडू जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच आर अश्विनसा बीसीसीआयकडून विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अश्विन यानंतर भरभरुन बोलला. मला कुटुंबियांनी घरी फार वेळ राहून दिलं नाही, असं अश्विनने सांगितलं.
आर अश्विन काय म्हणाला?
“कुटुंबियांनी मला घरातून बाहेर काढलं, कारण ते मला आधीच वैतागलेले”, असं अश्विनने हसत हसत म्हटलं. क्रिकेट खेळत असताना विविध दौऱ्यानिमित्ताने बाहेर असायचो, मात्र आता घरी अधिक वेळ घालवण्याचा अनुभव नवा आहे, असंही अश्विनेन सांगितलं.
आयपीएलबाबत काय म्हटलं?
अश्विनने या कार्यक्रमात आयपीएलच्या तयारीबाबतही सांगितलं. “मी सध्या सराव करत आहे. माझ्या ट्रेनरसह मेहनत करतोय. लवकरच आयपीएल येतंय, मी त्यासाठी पूर्णपणे तयार आहे”, असं अश्विन म्हणाला. अश्विन आयपीएलच्या आगामी 18 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणार आहे. सीएसकेने अश्विनला काही महिन्यांपूर्वी झालेल्या मेगा ऑक्शनमधून 9 कोटी 75 लाख रुपये मोजून आपल्या गोटात घेतलं होतं.
अश्विनची आयपीएल कारकीर्द
दरम्यान अश्विनने आतापर्यंत आयपीएलमध्ये विविध संघांकडून एकूण 211 सामने खेळले आहेत. अश्विनने 211 सामन्यांमधील 208 डावांमध्ये 180 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच अश्विनने 94 डावांमध्ये 1 अर्धशतकासह 800 धावाही केल्या आहेत.