Published on
:
02 Feb 2025, 5:37 am
Updated on
:
02 Feb 2025, 5:37 am
गडचिरोली : पुढारी वृत्तसेवा
भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती व उपसभापती सुखराम मडावी (वय ४५) यांची नक्षल्यांनी काल (ता.१) रात्री गळा दाबून हत्या केल्याने खळबळ माजली आहे. यामुळे नक्षल्यांनी पुन्हा डोके वर काढून जनतेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे.
मडावी हे भामरागड तालुक्यातील कियर येथील रहिवासी होते. २०१७ ते २०१९ अशी अडीच वर्षे ते भामरागड पंचायत समितीचे सभापती होते. त्यानंतरची अडीच वर्षे ते उपसभापती म्हणून कार्यरत होते.
कियर हे गाव भामरागड तालुका मुख्यालयापासून १२ किलोमीटर अंतरावर असून, कोठी पोलिस मदत केंद्रांतर्गत समाविष्ट आहे. काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सशस्त्र नक्षलवादी कियर गावात गेले. त्यांनी सुखरामला झोपेतून उठवून गावाबाहेर असलेल्या एका मैदानावर नेले. तेथे त्यांना जबर मारहाण करुन त्यांची हत्या केली. नक्षल्यांनी घटनास्थळी एक पत्रक टाकले असून, त्यात सुखराम मडावी हे पोलिस खबरी होते. त्यांनी ठिकठिकाणी पोलिस मदत केंद्र उघडण्यास आणि लोहखाणीला समर्थन देणारे काम केले, म्हणून त्याची हत्या केल्याचे पत्रकात म्हटले आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घटनेला दुजोरा दिला आहे. सुखराम मडावी हे पोलिस खबरी नव्हते. नक्षल्यांनी एका निरपराध व्यक्तीची हत्या केली आहे. यासंदर्भात पोलिस चौकशी करीत असल्याचे नीलोत्पल यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या पाच-सहा वर्षांत अनेक नक्षली पोलिसांच्या चकमकीत ठार झाले असून, अनेक जहाल नक्षल्यांनी आत्मसमर्पणही केले आहे. यामुळे नक्षलवादी संपले, असा दावा राज्य सरकार करीत असताना नक्षल्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्येचा मार्ग पुनहा अवलंबून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
२३ वर्षांत भामरागडमध्ये तीन राजकीय नेत्यांची हत्या
भामरागड तालुक्यात मागील २३ वर्षांत नक्षल्यांनी ३ राजकीय नेत्यांची हत्या केली आहे. १० फेब्रुवारी २००२ रोजी काँग्रेसचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष मालू कोपा बोगामी यांची नक्षल्यांनी हत्या केली. ही मोठ्या राजकीय नेत्याची हत्या होण्याची पहिलीच घटना होती. त्यानंतर २८ जानेवारी २०१२ रोजी भामरागड पंचायत समितीचे सभापती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बहादूरशहा आलाम यांची हत्या झाली. त्यानंतर आता १ फेब्रुवारी २०२५ ला भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडावी यांचा खून केला.