Published on
:
21 Jan 2025, 10:23 am
Updated on
:
21 Jan 2025, 10:23 am
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पिंपळे निलख, विशालनगर परिसरात मुळा नदीपात्रात भर टाकून सुरक्षा भिंत बांधण्याचे काम महापालिकेकडून करण्यात येत आहे. परंतु, या कामामुळे नदीपात्र अरुंद होऊन परिसरातील रहिवासी भागांसह विरुद्ध बाजूला असलेल्या बाणेर, बालेवाडी येथेही पावसाळ्यामध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवत आहे. यामुळे बाणेर, बालेवाडी परिसरातील नागरिकांसह पर्यावरणप्रेमींनी या कामाला तीव— विरोध दर्शविला आहे.
पावसाळ्यामध्ये बाणेर, बालेवाडी परिसरामध्ये नदीकाठी असणार्या अनेक भागांमध्ये पाणी शिरते. या भागातील अनेक रहिवासी सोसायट्यांच्या तळमजल्यावर पावसाळ्यात पाणी शिरते. बालेवाडी, भीमनगर परिसर तसेच बाणेर येथील साईदत्त रेसिडेन्सी व इतर नदीकाठी असणार्या भागांमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरते. नदीचे पात्र मोठे असताना देखील या भागात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. त्यातच आता पिंपरी-चिंचवड परिसरात सुरक्षा भिंत बांधण्यासाठी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद झाले असून, पावसाळ्यामध्ये बाणेर, बालेवाडी भागात पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका संभवत आहे. या ठिकाणी नदीपात्रात राडारोडा टाकण्यात आल्याने पर्यावरणाचा र्हास होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे काम तातडीने थांबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली.
काम न थांबल्यास जनआंदोलनाचा इशारा
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विशालनगर, पिंपळे निळख परिसरात सुरक्षा भिंत बांधण्यासाठी भराव टाकून नदीपात्र अरुंद केले जात आहे. या अतिक्रमणामुळे पावसाळ्यात नदीप्रवाहाला अडथळा निर्माण होणार आहे. यामुळे बालेवाडीमधील भीमनगर व बाणेरमधील प्रथमेश पार्क, डी. एस. के. गंधकोश सोसायटी, साईदत्त सोसायटी, कपिल मल्हार सोसायटीमध्ये पाणी शिरण्याचा धोका आहे. महापालिकेने त्वरित सुरक्षा भिंतीचे काम थांबवावे व येथील भराव काढून घ्यावा; अन्यथा जनआंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
भविष्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा विचार करून विविध विकासकामे व सुधारणा झाल्या पाहिजेत. सध्या बदलत असलेल्या पावसाळ्याचे गणित पाहता ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून पावसाळ्यात नदीच्या प्रवाहाला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी नदीपात्र मोठे असले पाहिजे. परंतु, विकासाच्या नावाखाली नदीपात्र अरुंद केले जात आहे. यामुळे विकासकामे खरोखरच नागरिकांच्या हितासाठी सुरू आहे की इतर कोणाच्या फायद्यासाठी? असा प्रश्न निर्माण होत आहे.
अॅड. अमेय जगताप, रहिवासी, बाणेर