अलिबाग | रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत 73 पैकी 54 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.यामध्ये मनसे,बहुजन विकास पार्टी,वंचित विकास आघाडीसह बहुतांशी अपक्ष आणि स्थानिक राजकीय पक्षांचे उमेदवार यांचा समावेश आहे.मनसेने पनवेल आणि श्रीवर्धनमध्येच निवडणूक लढविली होती.
रायगडात 20 नोव्हेेंबरला मतदान झाले.यामध्ये सात मतदार संघातून 73 उमेदवार आपले राजकीय भवितव्य अजमावित होते.यामध्ये 111 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. यामध्ये पनवेल 23,कर्जत 13,उरण 16,पेण 15,अलिबाग 23,श्रीवर्धन 13 आणि महाडमध्ये 8 उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले.यामधून 38 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.यामध्ये पनवेल 10,कर्जत 4,उरण 2,पेण 8,अलिबाग 9,श्रीवर्धन 2, आणि महाडमधील 3 उमेदवारांनी माघार घेतली. सात मतदार संघात एकूण 73 जण रिंगणात उरले होते. यामध्ये पनवेल 13,कर्जत 9,उरण 14,पेण 7,अलिबाग 14, श्रीवर्धन 11, महाड 5 उमेदवारांचा समावेश होता. यामधून एकूण 19 उमेदवारांचे अनामत रक्कम वाचली आहे.यामध्ये मतदारसंघातून विजयी झालेल्या आ.प्रशांत ठाकूर( पनवेल),महेंद्र थोरवे (कर्जत),रवी पाटील( पेण),महेश बालदी (उरण),अलिबाग (महेंद्र दळवी),आदिती तटकरे( श्रीवर्धन),भरत गोगावले ( महाड ) यांच्यासह अन्य पक्षांचे प्रमुख पराभूत उमेदवार बाळाराम पाटील,लीना गरड ( पनवेल),सुधाकर घारे,नितीन सावंत (कर्जत),प्रीतम म्हात्रे,मनोहर भोईर ( उरण),प्रसाद भोईर,अतुल म्हात्रे (पेण),चित्रलेखा पाटील,दिलीप भोईर( अलिबाग),अनिल नवगणे( श्रीवर्धन),स्नेहल जगताप( महाड) या उमेदवारांचा समावेश आहे.तर श्रीवर्धनमधून निवडणूक लढविणारे काँग्रेसचे बंडखोर राजेंद्र ठाकूर, मनसेचे फैजल पोपेरे ,बसपचे अश्विनी साळवी यांच्यासह चार अपक्षांची अनामत जप्त झालेली आहे. महाडमध्ये 3 ,पनवेल 10,श्रीवर्धन 9, उरण 11, कर्जत 6,पेण 4,अलिबाग 11 अशी अनामत रक्कम जप्त झालेली आहे.
अनामत रक्कम कधी जप्त होते?
उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या 1/6 म्हणजेच 16.33 टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास, त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. याचा अर्थ असा की, ज्या उमेदवाराने 25,000 रुपये किंवा 10,000 रुपये रक्कम जमा केली असल्यास, त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणताही परतावा दिला जाणार नाही. उदाहरणार्थ- जर विधानसभेच्या जागेवर एकूण 2,00,000 मते पडली, तर सुरक्षा ठेव वाचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी एक-षष्ठांश मते मिळवावी लागतील. याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला 33,332 पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक आहे. 1951 ते 52 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी जवळपास 40 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली होती.