राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाकुंभमध्ये (Mahakumbh) झालेल्या चेंगराचेंगरीवरून मोदी व योगी सरकारच्या ढोंगीपणावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर उपसभापतींनी त्यांचा माईक बंद केला. बुधवारी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत बोलताना देखील संजय राऊत यांनी मोदी व योगी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ”चेंगराचेंगरी झाली तिथे तीस हजार कॅमेरे, त्याचे फुटेज का समोर आणत नाहीत”, असा सवाल मोदी व योगी सरकारला केला आहे.
”संसदेत काल मी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना महाकुंभविषयी बोललो. महाकुंभ आमच्याासाठी श्रद्धेचा विषय आहे. आम्ही भावनिकरित्या जोडलेलो आहोत. मी स्वत: कुंभमेळ्याला जाणार आहे. पण जी दुर्घटना घडली त्याला कुणीतरी जबाबदार आहे. जी चेंगराचेंगरी झाली त्याची कारण काय व नक्की कि्ती श्रद्धाळू मरण पावले हा माझा प्रश्न आहे. मी म्हणत नाही की त्या घटनेला सरकार किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती जबाबदार आहे. आजही त्या दिवसापासून दोन ते अडीच हजार लोकं बेपत्ता आहेत. चार दिवसांपूर्वी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्यात आली. लोकामंध्ये चर्चा आहे की दोन ठिकाणी जिथे चेंगरांचेंगरी झाली तिथे पंधराशे ते दोन हजार भाविक मृत्युमुखी पडले आहेत. जिथे घटना झाली तिथे तीस हजाराच्या वर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत तर त्याचे फुटेज का समोर आणत का नाही ? असा सवाल संजय राऊत यांनी केला.