यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाच गालबोट लागलं आहे. पंचाला लाथ मारणं आणि त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोन मल्लांवर तीन वर्षासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने या दोघांवर कारवाई केली आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात मोठा वाद झाला. अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. या सामान्यात पंचाने शिवराज राक्षेला बाद घोषित केलं. त्यामुळे शिवराजने चिडून पंचाला लाथ मारली आणि शिवीगाळ केली. त्यानंतर अंतिम सामन्यात सुद्धा असच झालं.
महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामना खेळवण्यात आला. हाफ टाइममध्ये महेंद्रने सुद्धा पंचाशी वाद घातला. पंचाला शिवागीळ केली. मैदान सोडलं. त्यामुळे पृथ्वीराजला विजयी घोषित करण्यात आलं. आता शिवराज राक्षे यांची आई सुरेखा राक्षे यांनी “शिवराज आणि महेंद्र गायकवाड या दोन मल्लांवर कारवाई केली, तर चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचावर काय कारवाई करणार?” असा सवाल केला आहे.
पंचाने शिवीगाळ केली
“यांना शिक्षा दिली, तशी पंचांना पण शिक्षा द्या ना मग. पंचांना नको का शिक्षा व्हायला? 9-10 वर्षापासून पोरावर अन्याय होतोय. जिल्ह्याच्या कुसत्यांमध्ये वेगळा दिला जातो. पोराच म्हणणं होतं, रिप्लाय दाखवा. या पलीकडे शिव्या का देईल तो?. आदल्यादिवशी मॅटवर खेळायला गेला, तेव्हा पण पंचाने शिवीगाळ केली” असं आरोप शिवराज राक्षेच्या आईने केला.
काका पवारांच्या मुलांसोबत असं का करता?
“शिवराज महाराष्ट्र केसरी होणार होते, पण ते ठरवून केलय. तुमच्या मनाला लागेल त्याला पैलवान करायचा. त्या पैलवानाला बाजूला घ्यायचं. पंचांनी पण ठरवून टार्गेट केलय. आमच्यावर बंदी आणली पण पंचांना शिक्षा काय? कुस्तीला जाण्याआधी पंच त्यांना खोचकपणे बोललो होते. आम्ही न्याय मागायला गेलो, आमचं म्हणणं होतं, रिव्यू दाखवा” अशी प्रतिक्रिया शिवराज राक्षेच्या एका नातेवाईकाने दिली. “गरिबांच्या मुलांवर अन्याय करता, मात्र पंचाच्या शिक्षेच काय? काका पवारांच्या मुलांसोबत असं का करता?” असा सवाल शिवराज राक्षेच्या आईने विचारला.