Published on
:
08 Feb 2025, 3:41 am
Updated on
:
08 Feb 2025, 3:41 am
मुंबई : SSC HSC Exam | दहावी आणि बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार (कॉपी) करताना सापडल्यास त्यावर थेट दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार आहे. यामध्ये अशा गैरप्रकाराना उद्युक्त करणारे, मदत करणाऱ्यावरही थेट कारवाई केली जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सामोऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे. बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत यंदा १४ लाख ९४ हजार बारावीचे विद्यार्थी, तर १६ लाख ७ हजार दहावीचे, असे एकूण ३१ लाखांवर विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परी क्षेसाठी तब्बल १ लाख ८० हजारांहून अधिक मनुष्यबळ कार्यरत करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असेल तर समुपदेशक नेमण्यात आले आहेत. त्यांची मदत विद्यार्थ्यांना घेता येईल. पण कॉपी करणे मात्र परीक्षार्थी विद्यार्थ्यांना महागात पडेल, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विविध बैठका झाल्या असून विद्यार्थ्यांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
विद्यार्थी आणि त्यांना कॉपी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्यांवरही थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये, शांतपणे पेपर लिहावेत. कॉपी करू नये, असे आवाहन मंडळाने केले आहे. विद्यार्थ्यांना काही अडचण असेल, परीक्षेचा तणाव असेल तर ते समुपदेशकाची मदत घेऊ शकतात. त्यांना ते फोनवर संपर्क करू शकतात, असेही मंडळाने आवाहन केले आहे हॉल तिकीट विसरले तरी परीक्षेची मुभा हॉल तिकीट विसरलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला त्या दिवशी बसू दिले जाईल. मात्र त्याच्याकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल आणि दुसऱ्या दिवशी मात्र त्याला हॉल तिकीट आणावे लागेल. परीक्षेला कोणत्याही वेशभूषेत येता येईल, असेही परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. मात्र विद्यार्थ्यांची तपासणी केल्यावरच त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे.