नाशिक : 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत म्हाडा सदनिकांबाबतची घोषणा करताना सभापती रंजन ठाकरे. समवेत मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे व अधिकारी.Pudhari News Network
Published on
:
08 Feb 2025, 5:51 am
Updated on
:
08 Feb 2025, 5:51 am
नाशिक : नाशिक गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ४९३ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा प्रारंभ मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.७) 'गो - लाईव्ह' कार्यक्रमांतर्गत दुपारी २. ३० वाजता करण्यात आला.
सदनिका सोडत माहिती पुस्तिका अधिकृत संकेतस्थळावर
नाशिक मंडळ कार्यालय समिती सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे उपस्थित होते. यावेळी नाशिक मंडळाचे सभापती रंजन ठाकरे यांच्या हस्ते सदनिका सोडतीसंदर्भातील माहिती पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. ही पुस्तिका https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छूक अर्जदारांनी नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी या पुस्तिकेचे अवलोकन करण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले. ठाकरे म्हणाले, मंडळातर्फे सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, तसे केल्यास नाशिक मंडळ अथवा म्हाडा प्रशासन कोणत्याही व्यवहारास, फसवणूकीस जबाबदार राहणार नाही.
दरम्यान, नाशिक मंडळाची सोडत दोन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत एकूण २९१ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तसेच २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील २०२ सदनिका प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अर्ज प्रक्रियेचा असा असेल कालावधी
७ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात झाली असून, ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना ६ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. ७ मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. ७ मार्च रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस, एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या अंतिम यादीची प्रसिद्धी १३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या संकेतस्थळावर केली जाणार आहे.