Published on
:
08 Feb 2025, 8:19 am
Updated on
:
08 Feb 2025, 8:19 am
जव्हार : जव्हार तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेची 10 हजार 994 तर शबरी आवास योजनेची 875 तसेच आदिम समाजासाठी जन मन घरकुल योजनेची 266 सर्व योजना मिळून एकूण 12 हजार 135 इतकी घरकुले मंजूर आहेत. बांधकामाकरिता ग्रामीण भागात या योजनेअंतर्गत घर बांधण्यासाठी प्रत्येकी सरकारकडून 1 लाख 20 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. तसेच 22000 रुपये रोजगार हमी योजनेतून मजूर पुरवठा केला जातो. एकूण 300 स्क्वेअर फुटांचे घर बांधणे अपेक्षित असते, परंतु बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती यामुळे जव्हार तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांनी सरकारच्या पैशात घर होत नाही, अशी खंत व्यक्त केली आहे.
या योजनेची रक्कम घरकुल लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात टप्प्या टप्प्याने जमा केली जाते, परंतु एकीकडे राज्यात महागाई ही वेगाने वाढत आहे. परंतु घरकुलाच्या अनुदानात वाढ केली जात नाही. घरकुल साहित्याच्या किमतीत भरमसाठ वाढ झाल्याने या घरकुल लाभार्थ्यांना घरासाठी लागणारे साहित्य खरेदी करणे परवडत नसल्याने तालुक्यातील घरकुल लाभार्थी उदासीन झाले आहेत. तसेच या योजेअंतर्गत रक्कम कमी पडल्याने घरे अपूर्ण अवस्थेत सोडून लाभार्थी कामाच्या शोधात शहराकडे धाव घेतात व त्या ठिकाणी हाताला जे काम मिळेल ते करून आलेले पैसे घेवून घरबांधणीसाठी येत असतात. मात्र घरकुलचे वेळेत हप्ते जमा होत नसल्याने लाभार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होत आहे.
सध्या विटांची किंमत एक विट 8 रुपयेप्रमाणे 10 हजार विटांची रक्कम ही 75000 हजार रुपये होते. त्यापण घरपोच होत असताना काही विटांचे तुकडे होत असतात, तसेच ग्रिट एक गाडीची किंमत 10 हजार प्रमाणे 3 गाड्यांची रक्कम ही 30 हजार होते, त्यामध्ये सिमेंट 15 हजार, छप्परासाठी लागणारे पत्रे 25 हजार तसेच प्लास्टर व बांधकाम मजुरी ही सगळ्यांची मिळून 20 ते 25 हजार होत असते विशेष म्हणजे घरासाठी नदी नाल्यांतून रेती काढली तर महसुल विभागाचे कर्मचारी रेती काढू देत नाही. तसेच लाभार्थ्यांंने स्वतः विटा पाडायला घेतल्या तर त्यांच्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे घरकुल कसे बांधायचे, असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे.
विविध घरकुल योजना सुरू आहेत, मात्र या घरकुल योजनेला 1,20,000 रुपये व 22000 रु. रोजगार हमी योजनेतून मजूर पुरवठा केला जातो. परंतु वाढती महागाई लक्षात घेता, शासनाने घरकुलाच्या किमतीत वाढ करणे गरजेचे आहे.
सुनील जाबर, ग्रामस्थ