माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन. दुसर्या छायाचित्रात राेहित शर्माFile Photo
Published on
:
08 Feb 2025, 11:12 am
Updated on
:
08 Feb 2025, 11:12 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा कसोटी आणि वनडेचा कर्णधार रोहित शर्मा याचा खराब फॉर्म हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मागील काही महिन्यांपासून रोहित अपयशाचा धनी होत आहे. आता १९ फेब्रुवारीपासून सुरु होणार्या चॅम्पियन ट्रॉफीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधले असतानाच भारताचा माजी क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विननेही राेहित शर्माच्या खराब फाॅर्मवर बोट ठेवले आहे. "रोहित शर्मासाठी हा कठीण काळ आहे. चॅम्पियन ट्रॉफीपूर्वीच ( Champions Trophy 2025) त्याला टीकाकारांना शांत करावे लागले," अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.
खराब फॉर्ममुळे रोहितने ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील शेवटच्या कसोटीत स्वतःहून विश्रांती घेतली होती. एका महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताना इंग्लंडविरुद्ध नागपूरमधील वनडे सामन्यात केवळ धावांपर्यंतच त्याची मजल गेली. त्यामुळे पुन्हा एकदा रोहित शर्माचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
रोहित शर्मासाठी हा कठीण काळ
रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, खराब फॉर्ममध्ये असलेल्या रोहित शर्मासाठी हा कठीण काळ आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याच्या फलंदाजीने चांगली कामगिरी करून टीकाकारांना शांत करण्याचा प्रयत्न करावा लागेल. हे सोपे नाही. तुम्ही रोहितच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्याच्यासाठी हे सारं काही नक्कीच निराशाजनक आहे. त्याला मालिकेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. आजवर त्याने वनडे फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याला चांगली कामगिरी करायला आवडेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.
"लोक नक्कीच प्रश्न विचारतील "
तुमचा फॉर्म खराब असेल क्रिकेट चाहते नक्कीच प्रश्न विचारतील. तुम्ही हे प्रश्न थांबवू शकत नाही. तुम्ही किती दिवस राहणार? रोहितने त्याच्या गेल्या १६ डावांमध्ये सर्व फॉरमॅटमध्ये फक्त १६६ धावा केल्या आहेत. एक क्रिकेटपटू म्हणून, रोहित कोणत्या टप्प्यातून जात आहे हे मला समजते. ते सोपे नाही. मी प्रार्थना करतो की तो चांगली कामगिरी करेल आणि या मालिकेत शतक करेल, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली.
अश्विनने केले जडेजाचे कौतुक
अश्विनने रवींद्र जडेजाच्या कामगिरीचे कौतुक केले. जेव्हा एखादा खेळाडू चांगली कामगिरी करतो तेव्हा आपले माध्यम त्याचे कौतुक करण्यास अपयशी ठरते. जेव्हा आपण हरतो तेव्हा सगळेच खलनायक बनतात. रवींद्र जडेजाने जो रूटला बाद केले. खेळाच्या प्रत्येक पैलूत जडेजा प्रासंगिक राहतो. तो एक चांगला गोलंदाज आहे आणि दबावाखाली फलंदाजी करतो. तसेच, तो एक अद्भुत क्षेत्ररक्षक आहे. जडेजा माझ्यापेक्षा खूपच प्रभावी आहे. क्षेत्ररक्षण करताना, तो या वयातही मैदानाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत धावू शकतो, असेही अश्विनने म्हटलं आहे.