आटपाडी येथे माणगंगा साखर कारखाना शेतकरी, सभासद व कामगारांच्या बैठकीत बोलताना आमदार गोपीचंद पडळकर.pudhari photo
Published on
:
08 Feb 2025, 1:55 pm
Updated on
:
08 Feb 2025, 1:55 pm
आटपाडी : आटपाडी येथील माणगंगा साखर कारखान्याच्या सभासदांचे मत असल्यास मी नेतृत्व करेन आणि माणगंगा कारखाना सभासदांचा रहावा म्हणून प्रयत्न करेन आणि तो लिलावात विकू देणार नाही असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.
आटपाडी येथील शासकीय विश्रामगृहावर माणगंगा साखर कारखान्याचे सभासद,कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यु. टी. जाधव, महादेव पाटील, विनायक पाटील, विष्णू अर्जुन, हरिदास गायकवाड, अशोक माळी, मच्छिन्द्र माळी, राहुल सपाटे, चंद्रकांत काळे आदी उपस्थित होते.
पडळकर म्हणाले, जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर पॅटर्न राबवत जिल्ह्यातील सहकारी संस्था बंद पाडून त्या ताब्यात घेण्याचे षडयंत्र सुरु आहे.हे षडयंत्र हाणून पाडू.जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्त करण्याची मागणी केली.
ते म्हणाले, लोकांचे अज्ञान आणि विश्वासावर ज्या शेतकऱ्यांनी जमिनी माणगंगेसाठी घेतल्या आहेत.ते सर्व खरेदी दास्तांची चौकशी करत आहेत. या कागदपत्राची मी देखील माहिती घेत आहे.
स्टेजवर माझ्या बापाचा कारखाना आहे असे म्हणणाऱ्यांनी आपली प्रॉपर्टी विकून तो मोकळा करावा असे सल्ला देत पडळकर यांनी कारखाना पण तालुक्याची अस्मिता असून ती जोपसण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.स्थानिक आमदारांनी कारखान्याबद्दल भूमिका स्पष्ट करावे.
ते म्हणाले, शेतकऱ्यांनी कारखान्याला दिलेली जमीन आणि कारखाना विकायचा नाही.माणगंगा सभासदांची मालकी आहे. या मालमत्तेला तिलांजली देऊन होणारा मनमानी कारभार आम्ही होऊ देणार नाही.कारखान्याची सत्ता असलेल्या मंडळींनी अन्यायाची सीमा ओलांडली आहे. पण सभासदांना न्याय देण्यासाठी मी जीवाचे रान करेन अशी ग्वाही देत स्थानिक आमदारांनी कारखान्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
तानाजी लवटे, कामगार, वाहनचालक, शिक्षक व सभासदानी आपल्या मनोगतात आम्ही कसे अडचणीत आलो याची कहाणीच कथन केली. आमच्या नांवावर कसं कर्ज काढले ते या काढलेल्या कर्जाचा बोजा चौपट झाल्याचे सांगितले.बँकेतील पत संपली असून घरे आणि जमिनीवर कर्जाचा डोंगर झाला आहे. आजारपण शिक्षण,लग्न याकरिता पैसे कोण देत नसल्याचे सांगत जगायचं कसं असा प्रश्न निर्माण झाल्याचे दुःख व्यक्त केले.
यावेळी माणगांगा बचाव समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी तानाजी लवटे यांची निवड करण्यात आली. सर्वानुमते अन्य सदस्य निवडून समितीच्या माध्यमातून माणगंगा बचाव मोहीम तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला.
कारखान्याने माझ्या नावावर 70 हजाराची मोटारसायकल घेतली. आता 2.25 लाखांचा बोजा झालाय. माळशिरस तालुक्यातून पाणी आणण्यासाठी कोट्यावधी खर्च केला पण पाणीच न आल्याने हा खर्च वाया गेला. 1250 मेट्रिक टन क्षमता असलेल्या कारखान्याचे काम चांगलं चाललं होतं पण क्षमता वाढवायचा निर्णय घेतला. जुने साहित्य वापरून क्षमता वाढली नाही पण कारखाना मात्र बंद पडला आहे.
कारखान्याचा एक सभासद
इस्लामपूर पॅटर्न राबवत जिल्ह्यातील सहकारी संस्था बंद पाडून त्या ताब्यात घेण्याचे षडयंत्र हाणून पाडू.
गोपीचंद पडळकर,आमदार