महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच त्यांच्या बिनधास्त वागण्यासाठी, तसेच स्पष्ट बोलण्यावरून, त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेचा विषय बनतात. एवढच नाही तर त्या त्यांच्या गाण्यांमुळेही तेवढ्याच प्रसिद्धी झोतात असतात.
अमृता फडणवीस या उत्तम गायिका असून त्यांनी स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. काही तासांपूर्वीच अमृता फडणवीस यांचं एक नवीन गाणं सोशल मीडियावर रिलीज झालं आहे. पण हे गाणं नेहमीपेक्षी थोड्या हटके अंदाजात आहे. शिवाय या गाण्यातील त्यांचा लूकही अगदी वेगळा आहे.
मिसेस मुख्यमंत्र्यांचं नवीन गाणं रिलीज
मिसेस मुख्यमंत्र्यांचं या नवीन गाण्याचं नाव आहे ‘मारो देव बापू सेवालाल’. त्यांनी गायलेल्या या गाण्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून चाहत्यांकडून गाण्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गाण्यासोबत मिसेस मुख्यमंत्र्यांनी या गाण्यात जो लूक केला आहे त्याची सर्वात जास्त चर्चा होताना दिसत आहे. कारण या गाण्यासाठी अमृता फडणवीस यांनी चक्क बंजारा लूक केला आहे. या लूकमध्ये त्या अत्यंत सुंदर दिसत असून नेटकऱ्यांनीही त्यांच्या या लूकला पसंती दर्शवली आहे.
अमृता फडणवीसांचा बंजारा लूक चर्चेत
या गाण्यात अमृता फडणवीसांनी बंजारा पोशाख घातलेला पाहायला मिळत आहे. टी-सीरीजच्या माध्यमातून अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्याचे गीतकार निलेश जालमकर आहे. तर संगीत दिग्दर्शन कामोद सुभाष यांनी केले आहे.
अमृता फडणवीस यांचं गाणं रिलीज होताच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. टी-सीरीजने त्यांच्या अधिकृत यु-ट्युब चॅनलवर अमृता फडणवीस यांचं ‘मारो देव बापू सेवालाल’ रिलीज केलं आहे.
संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने हे गाणं रिलीज होणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले. “#मी पुन्हा येत आहे… आपली संस्कृती आणि धरोहर तुमच्यापर्यंत पोहचविण्यासाठी संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्ताने एक गीत घेऊन येत आहे. संपर्कात रहा.” असं कॅप्शन देत त्यांनी इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे.
अमृता फडणवीस बँकर असण्यासोबतच उत्तम गायिका
दरम्यान, येत्या 15 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराजांची जयंती आहे. त्यानिमित्ताने हे गाणं लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचं हे नवं कोरं गाणं ऐकण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. अमृता फडणवीस या कायमच आपली कला जपताना पाहायला मिळतात. त्यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
इन्स्टाग्रामवर त्यांचे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहेत. अमृता फडणवीस बँकर असण्यासोबतच गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्याही आहेत. तसेच त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय असतात. अशा अनेक नवीन गोष्टी त्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात.