दिल्लीत २७ वर्षांचा राजकीय दुष्काळ दूर करून भाजप सत्तेत आली आहे.
Published on
:
08 Feb 2025, 1:43 pm
Updated on
:
08 Feb 2025, 1:43 pm
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
राजधानी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या सत्तेचा दुष्काळ शनिवारी संपला. भाजपने दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी ४८ मतदारसंघात विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ‘आप’ला केवळ २२ मतदारसंघात विजय मिळाला असून काँग्रेसची दुर्वास्था कायम राहिली आहे. राजधानीच्या निवडणुकीत काँग्रेसला सलग तिसऱ्यांदा भोपळा फोडता आला नाही. यासोबतच आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राजधानी दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांसाठी ५ फेब्रुवारी, बुधवारी मतदान झाले. यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी सर्व जागांचे निकाल जाहीर केले आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार, भाजपला दिल्लीत स्पष्ट बहुमत मिळाले आहे. बहुमतासाठीचा ३६ जागांचा आकडा पार करत ४८ विधानसभा मतदारसंघात विजय मिळवला आहे. यामुळे केंद्रात सलग तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपचा दिल्लीतील सत्तेचा दुष्काळ संपला आहे. आम आदमी पक्ष दिल्लीत मागच्या १२ वर्षांपासून सत्तेत आहे. त्याअगोदर सलग तीन वेळा म्हणजे जवळपास १५ वर्षे काँग्रेसची सत्ता होती. यामुळे जवळपास तीन दशकांपासून भाजपला राजधानीत सत्तेसाठी संघर्ष करावा लागला आहे. दुसरीकडे सलग ३ वेळा दिल्लीच्या सत्तेत राहणारा काँग्रेस पक्ष मागच्या सलग ३ निवडणुकींमध्ये भोपळा फोडू शकला नाही. त्यामुळे काँग्रेसच्या पदरीची घोर निराशा यावेळेसही कायम राहिली आहे. मात्र, मागच्या निवडणुकीपेक्षा काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली आहे.
‘आप’च्या दिग्गज नेत्यांचा पराभव
यंदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ४ हजार ८९ मतांनी भाजपच्या प्रवेश सिंह वर्मा यांनी पराभव केला. केजरीवाल यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना ४ हजार ५६८ मते मिळाली आहेत. जंगपुरा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा ६७५ मतांनी पराभव झाला असून या मतदारसंघात भाजपचे तरविंदर सिंह मारवाह विजयी झाले आहेत. तसेच ‘आप’चे नेते आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांचा ३ हजार १८८ मतांनी पराभव झाला आहे. या मतदारसंघात भाजपच्या शिखा रॉय विजयी झाल्या आहेत.
पराभूत झालेले चर्चेतील चेहरे
अरविंद केजरीवाल (आप)- नवी दिल्ली
मनीष सिसोदिया (आप)- जंगपुरा
सौरभ भारद्वाज (आप)- ग्रेटर कैलाश
सत्येंद्र जैन (आप)- शकूरबस्ती
अवध ओझा (आप)- पटपडगंज
सोमनाथ भारती (आप)- मालवीय नगर
अल्का लांबा (काँग्रेस)- कालकाजी
संदीप दीक्षित (काँग्रेस)- नवी दिल्ली
रमेश बिधुडी (भाजप)- कालकाजी
दुष्यंत गौतम (भाजप)- करोल बाग
विजयी झालेले चर्चेतील चेहरे
अतिशी मार्लेना (आप)- कालकाजी
गोपाल राय (आप)- बाबरपूर
अमानतुल्लाह खान (आप)- ओखला
प्रवेश वर्मा (भाजप)- नवी दिल्ली
विजेंद्र गुप्ता (भाजप)- रोहिणी
कैलाश गेहलोत (भाजप)- बिजवासन
कपिल मिश्रा (भाजप)- करावल नगर
भाजप कार्यालयात जल्लोष तर ‘आप’ कार्यालयात शांतता
दिल्ली निवडणुकीच्या विजयानंतर भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला. नेते आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. तर दुसरीकडे आम आदमी पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यालयात शांतता होती.
दिल्ली सचिवालय सील करण्यात आले
दिल्ली निवडणुकीचे निकाल जाहीर होताना सामान्य प्रशासन विभागाने एक सूचना जारी केली आहे. विभागाच्या परवानगीशिवाय कोणताही संगणक, हार्ड ड्राइव्ह आणि फाइल इत्यादी दिल्ली सचिवालयाबाहेर जाणार नाही, असे सांगण्यात आले. सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी फाईल, कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक माहिती इत्यादींची सुरक्षा करावी, असे नोटीसमध्ये म्हटले आहे. नोटीसनंतर दिल्ली सचिवालय सील करण्यात आले आहे.
विकास आणि सुशासनाचा विजय झाला. ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल दिल्लीतील जनतेचे आभार. दिल्लीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आणि लोकांचे जीवन सुधारण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही; ही आमची गॅरंटी आहे.
– पंतप्रधान नरेंद्र मोदी
हा अहंकार आणि अराजकतेचा पराभव आहे. या प्रचंड जनादेशाबद्दल दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. भाजप आपली सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि दिल्लीला जगातील नंबर १ राजधानी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे.
- अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
दिल्लीत 'आप-दा' सरकारने भ्रष्टाचार, कुशासन आणि तुष्टीकरणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. आज, दिल्ली त्यांच्या खोटेपणा, कपट आणि फसवणुकीपासून मुक्त झाली आहे.
- जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप आणि केंद्रीय मंत्री
दिल्लीत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला. दिल्लीत, विकास, सुशासन आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या मूलभूत मंत्रासह, आम्ही सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या महामार्गावर पुढे जात आहोत.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री
दिल्लीच्या जनतेने दिलेला कौल मी मान्य करतो. भाजपच्या विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन. जनतेने त्यांना बहुमत दिले आहे. मला आशा आहे की, ते लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू.
- अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय संयोजक, ‘आप’
आम्ही जनादेश स्वीकारतो. मी जिंकले आहे पण ही वेळ आनंद साजरा करण्याची नाही तर भाजपविरुद्ध लढाई सुरू ठेवण्याची आहे.
- अतिशी, मुख्यमंत्री दिल्ली
हे निकाल येणारच होते. प्रत्येक सभेतून हे स्पष्ट झाले की, लोकांना बदल हवा होता. त्यांनी बदलासाठी मतदान केले. काँग्रेसचा विचार केला तर अधिक मेहनत घ्यावी लागेल.
- खासदार प्रियंका गांधी, काँग्रेस सरचिटणीस
उत्तर प्रदेशाच्या मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपचा विजय
दिल्ली निवडणुकीसोबत उत्तर प्रदेशातील मिल्कीपूर आणि केरळमधील इरोड पूर्व विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले. यामध्ये मिल्कीपूर मतदारसंघात भाजपच्या चंद्राभानू पासवान यांचा ६१ हजार ७१० मतांनी विजय झाला आहे. तर समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद पराभूत झाले आहेत. केरळच्या इरोड पूर्व मतदारसंघात द्रमुकचे चंदीकुमार. व्ही.सी. विजयी झाले आहेत.