बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चरस, गांजासह एमडीची विक्री करणार्या चौकडीच्या मुसक्या आवळल्याPudhari News Network
Published on
:
08 Feb 2025, 5:32 am
Updated on
:
08 Feb 2025, 5:32 am
डोंबिवली : देशाच्या भावी पिढीला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी खास पथक स्थापन केले आहे. या पथकाने गेल्या दोन दिवसांत लक्षवेधी कारवाई करून चरस, गांजासह एमडीची विक्री करणार्या चौकडीच्या मुसक्या आवळून गजाआड केले.
कल्याण परिमंडळ 3 च्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक प्रसाद चव्हाण आणि त्यांचे सहकारी खासगी वाहनाने गस्त घालत असताना मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमआयडीसी रोडला असलेल्या सावित्रीबाई फुले कला मंदिराजवळ सनिल श्रीनाथ यादव (25, रा. नांदीवली टेकडी, डोंबिवली-पूर्व) हा संशयास्पदरित्या घुटमळताना आढळून आला. पथकाने पळून जाण्याची संधी न देता झडप घालून त्याला ताब्यात घेतले. या बदमाशाकडून 8.48 ग्रॅम वजनाची 16 हजार 500 रूपये किंमतीची एमडी पावडर हस्तगत केली. या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम 8 (क), 21 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या कारवाईत कल्याण पश्चिमेकडील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुर्गामाता चौकात पथकाने सापळा लावून शंकर महादेव गिरी (46, रा. मु-पो. टाकळी अम्या, ता. आष्टी, जि. बीड) याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून 9 किलो 950 ग्रॅम वजनाचा 1 लाख रूपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला. या संदर्भात बाजारपेठ पोलिस ठाण्यात सदर बदमाशाच्या विरोधात अंमली पदार्थ विरोधी कायद्याचे कलम 8 (क), 20 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तिसर्या कारवाईत डोंबिवलीतील रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राजाजी रोडला असलेल्या स्वामी नारायण मंदिराजवळ पथकाने जाळे पसरले होते. या जाळ्यात सचिन एकनाथ कावळे (32, रा. वसंत किणे चाळ, प्रगती कॉलेज मागे, डीएनसी रोड डोंबिवली-पूर्व) यांच्यासह 16 वर्षीय तरूण असे दोघेजण अडकले. या दुकालीच्या ताब्यातून 23.53 ग्रॅम वजनाची एमडी पावडर आणि 10 ग्रॅम वजनाचा चरस असा 93 हजार 943 रूपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला.
19 आरोपींकडून 12 लाखांचा साठा हस्तगत
पोलिस परिमंडळ 3 च्या हद्दीत 1 जानेवारीपासून आजतागायत विशेष अंमली पदार्थ विरोधी पथकामार्फत एकूण 13 गुन्हे वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांतून दाखल करण्यात आले आहेत. या 13 कारवायांदरम्यान 19 आरोपींकडून 63 ग्रॅम एमडी पावडर, 232 कोडीनयुक्त बॉटलसह नशेच्या गोळ्या, 47 किलो 44 ग्रॅम वजनाचा गांजा असा जवळपास 12 लाखांहून अधिक किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले.