Published on
:
08 Feb 2025, 7:58 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:58 am
दिल्ली : Delhi Assembly Election Result 2025 | स्पष्ट बहुमतासह मोठ्या विजयाकडे दिल्लीत भाजपची घोडदौड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात संध्याकाळी ७.३० वा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप मुख्यालयात जाऊन पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करून आभार व्यक्त केले. त्याच पद्धतीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर आज पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
दरम्यान, भाजपसाठी हा विजय खूप महत्त्वाचा आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले. अनेक राज्यांमध्ये भाजपला सरकार मिळवण्यात यश आले. जिथे आधीच भाजपचे सरकार होते ते टिकवून ठेवता आले. मात्र गेल्या २७ वर्षांमध्ये दिल्लीने भाजपला हुलकावणी दिली होती आणि त्याची सल भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांच्या मनात होती. त्यामुळे दिल्ली जिंकत एक मोठं विजयाचे वर्तुळ भाजपने पूर्ण केले.