Published on
:
08 Feb 2025, 7:58 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:58 am
पुढारी ऑनलाईन डेस्क - सध्या मालिका विश्वात 'लक्ष्मी निवास' चीच सर्वत्र चर्चा सुरु आहे. प्रत्येक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. या कुटुंबातली शेंडे फळ म्हणजेच जान्हवीची भूमिका साकारत असलेली दिव्या पुगावकर हिने संवाद साधताना खूप गोष्टींना उजाळा दिला. "लक्ष्मी निवास मालिकेसाठी माझी कास्टिंग सर्वात शेवटी झाली होती. माझ्या कास्टिंगचा एक गंमतीशीर किस्सा असा आहे, मला ऑडिशनला बोलावण्यात आलं. मी ऑडिशनही दिलं, मग मला कॉल आला की, ९९ टक्के तुमचं सिलेक्शन होताना दिसत आहे. हे सर्व झालं पण अजून माझं कास्टिंग झाले नव्हतं.
मला दुसऱ्या दिवशी "लक्ष्मी निवास" चा पहिला टीजर आऊट झालेला दिसला. ज्यात एक फॅमिली फोटो दाखवला गेला होता. त्यात अक्षया देवधर क्लियर दिसत होती आणि जान्हवीच पात्र आहे तिथे ही एक मुलगी दिसली, तेव्हा वाटलं की, काही गोष्टी जुळल्या नसतील म्हणून आपलं कास्टिंग नाही झालं. पण मी टीझर पाहून खूप खुश झाले. कारण तो खूप छान दिसत होता. थोड्या वेळातच मला निर्माते सुनील भोसले यांचा कॉल आला मी आधी त्यांचं अभिनंदन केले कारण माझा असा गैरसमज होता कि माझं कास्टिंगच झालं नाहीये. तेव्हा ते म्हणाले की, तूच जान्हवी आहेस, आम्ही प्रोमोसाठी फक्त एका मुलीला बोलावले होते. अशा पद्धतीनी माझी कास्टिंग झालं.
जसं प्रत्येक कुटुंबामध्ये एक सदस्य खास असतो. तसेच 'लक्ष्मी निवास' मध्ये आहे. मी हर्षदा ताईला आधीपासून ओळखते, तिच्या सोबत काम करण्याची फार इच्छा होती आणि ती आता पूर्ण होत आहे. लहानपणापासून मी तिला स्क्रीनवर बघत आली आहे. आता माझ्या दोन फॅमिलीस आहेत. एक रिअल लाईफ फॅमिली आहे आणि एक रीललाईफ फॅमिली जी आहे 'लक्ष्मी निवासची'. मला आज ही शूटिंगचा पहिला दिवस आठवत आहे. मी टीममध्ये सगळ्यात शेवटी आले आणि त्यादिवशी मी सर्वात आधी अक्षयाला म्हणजे भावनाला भेटले. कारण आम्ही दोघी व्हॅनिटी शेयर करत होतो. तिचं असं रिअक्शन होतं, "अच्छा फायनली जान्हवी तू करतेयस का? आता शूटिंग सुरु होईल. कारण बरेच दिवसांपासून जान्हवीचं कास्टिंग राहीलं होतं आणि खूप मुली यायच्या जान्हवीच्या भूमिकेसाठी पण काही जमत नव्हतं.
बाकी सगळ्या टीमला भेटली तेव्हा त्यांचं पण असेच मत होतं की, आता ही आली कुटुंब पूर्ण झालं आणि शूटिंगला सुरुवात होणार. मला जान्हवीचा लूकही फार आवडला. जान्हवीच्या लुकची खूप लूक टेस्ट झाल्या. आमची कॉस्ट्यूम डिझायनर आहे तिने खूप मेहनत घेतली आणि जान्हवीच्या लुकसाठी हे ड्रेस खास बनवून घेतले. जान्हवी कॉटनचे फ्लोर लेन्थ ड्रेसेस, विथ पफ स्लिव्हस वापरते. मला कॅमेरासमोर ते मिरवायला मिळतात याचा आनंद आहे. मुलींना असे ड्रेसेस आवडतातच. जान्हवीला एक छान ब्रेसलेट दिले आहे जे मुलींना खूप आवडेल."
"लक्ष्मी निवास" रोज रात्री ८ वा. झी मराठीवर पाहा.