देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्तरावरील नेते नाहीत, त्यांनी महाराष्ट्रात बघावे. त्यांनाही राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची इच्छा असावी, पण जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत त्यांना राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळेल का? याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. फडणवीस दिल्लीत स्टार प्रचारक म्हणून गेले, पण त्यांनी प्रचार केला नसता तरी हाच निकाल आला असता. कारण निकाल ठरलेला होता, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत शनिवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे सुरुवातीच्या कलांवरून दिसत आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, काल दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत हे स्पष्ट केलेले की दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू केलेला आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात विजय प्राप्त केला, निकाल मिळवला, ज्या प्रकारे लोकशाहीतील घृणास्पद कृत्य घडवून आणली ते राहुल गांधी यांनी एक्स्पोज केले.
लोकसभा निवडणूक ते विधानसभा निवडणूक या 5 महिन्यांच्या काळात 39 लाख मतं वाढली. प्रौढ मतदारांचा आकडा आहे त्याच्यापेक्षा जास्त मतदान झाले. हे मतदान आले कुठून? निवडणूक आयोगाने जो आकडा दिला आहे त्याच्यापेक्षा साधारण 40 लाख मतदान जास्त झाले. त्याचा हिशेब निवडणूक आयोग देत नाही. हाच पॅटर्न दिल्लीत राबवला गेला. प्रत्येक मतदारसंघात किमान 15-20 हजार मतं वाढवण्यात आली, असा दावा राऊत यांनी केला. महाराष्ट्रातील 39 लाख मतं आली कुठून आणि जाणार कुठे याबाबत मला विचारण्यात आले होते. त्यातले काही बोगस मतदार दिल्लीत वळवले आणि त्यानंतर ही मतं जशीच्या तशी बिहार निवडणूक जातील. हा फॉर्म्युला ठरलेला आहे, असेही ते म्हणाले.
…तर पहिल्या तासाभरात भाजपचा पराभव निश्चित झाला असता
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 वर्षापासून दिल्लीत होते, पण ते दिल्ली जिंकू शकले नव्हते. राजकारणातील त्यांची शेवटची इच्छा असावी की मी असेपर्यंत आपण काहीही करून दिल्लीही जिंकली पाहिजे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दिल्ली जिंकण्याचा प्रयत्न होत आहे. अर्थात दिल्लीत काँटे की टक्कर सुरू आहे. पण काँग्रेस आणि आपची आघाडी झाली असती तर चित्र वेगळे असते. आप आणि काँग्रेसचा राजकीय विरोधक भाजप आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आप आणि काँग्रेस लढेते, पण वेगवेगळे. दोघेही एकत्र लढले असते तर पहिल्या तासाभरात भाजपचा पराभव निश्चित झाला असता, असेही राऊत म्हणाले.
मोदी-शहा व्यापारी
ते पुढे म्हणाले की, केजरीवाल यांनी 10 वर्ष उत्तम कार्य केले. पण मोदी, शहा राजकारण व्यक्तिगत पातळीवर घेतात. कारण ते व्यापारी आहेत. व्यापारी जसा व्यक्तिगत पातळीवर फायदा, तोटा पाहतो त्या पद्धतीने मोदी, शहा राजकारण करतात. दिल्लीसारख्या लहान राज्यात नायब राज्यपालांच्या हातात सर्व अधिकार देण्यात आले आणि केजरीवाल सरकारला काम करून दिले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार, खासदारांना तुरुंगात टाकले. हाच पॅटर्न महाराष्ट्रात होता. तो दिल्लीतही राबवला गेला.
दिल्लीत जागोजागी टेबल टाकून पैशाचे वाटप
दिल्लीत जागोजागी टेबल टाकून पैशाचे वाटप चालू होते. पोलिसांना अमित शहांच्या कार्यालयातून स्पष्ट सूचना होत्या की तक्रारी घ्यायच्या नाहीत. हार-जित होते, संघर्ष होतो, राजकारणात लढाई होते. पण अशा पद्धतीने या देशात कुणी लढले नव्हते. महाराष्ट्रातील निवडणूकही अशीच लढली गेली, दिल्लीतही असेच लढले आणि याच पद्धतीने बिहारची निवडणूक लढली जाईल, असेही राऊत म्हणाले.