वसमत तालुक्यातील चिखली फाट्यावर एसएसटी पथकाची कामगिरी
वसमत/हट्टा (Wasmat Assembly Election) : वसमत तालुक्यातील चिखली तपासणी नाक्यावर एका खासगी बसची एसएसटी पथकाकडून रविवारी सकाळच्या सुमारास तपासणी केली असता तीन सॅब बॅगामधून ८९ लाख ७८ हजार ५०० रूपयाची रोकड जप्त करण्यात आली. यामध्ये तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक (Wasmat Assembly Election) निमित्ताने जिल्ह्याच्या सिमेवर पोलीस व महसूल प्रशासनाने तपासणी नाके उभारले आहेत. जिल्ह्यात येणारी प्रत्येक वाहने तपासणी करूनच सोडली जात आहेत. अधुनमधून वरिष्ठ अधिकारी सरप्राईज भेट देत असल्याने त्या ठिकाणचे पथक नेहमीच सतर्क असते. वसमत ते परभणी मार्गावर चिखली येथे १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.१५ वाजता मुंबईवरून नांदेडकडे जाणारी खासगी बस क्रमांक एम.एच.२३-ए.यू.७७०३ ची एसएसटी पथकाकडून अचानक तपासणी करण्यात आली. याच तपासणी दरम्यान बॅगांची तपासणी सुरू असताना बसमधील एक प्रवासी काहीशा घाबरलेल्या अवस्थेत दिसून आला.
त्यामुळे पथकाचा संशय बळावून त्यांनी त्याच्या तीन बॅगा तपासणीसाठी पथकाकडे आल्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोकड दिसून आली. त्यामुळे ही रोकड कुठून कुठे नेली जात आहे, तसेच ही रोकड कोणाची आहे, याबाबत पथकाने विचारपूस केली. त्यानंतर चेक पोस्टवर रोकड आणून मशिनद्वारे त्याची मोजणी केली असता सॅपमध्ये ८९ लाख ७८ हजार ५०० रूपयाची रोकड मिळून आल्याने एसएसटी पथक व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईत ही रोकड जप्त करण्यात आली. या (Wasmat Assembly Election) कारवाईत नोडल अधिकारी जी.बी.पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे होते. ही रक्कम वसमत उपकोषागार कार्यालयात जमा करण्यात आली.
ही कारवाई जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा दळवी, आचार संहिता प्रमुख सुनील अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाकडून करण्यात आली आहे. मुंबईहून नांदेडकडे जाणार्या खासगी बसमधून ८९ लाख ७५ हजार ५०० रूपयाची रोकड नेण्यात येत असताना वसमत तालुक्यातील चिखली फाट्यावर एसएसटी पथकाने ही रोकड जप्त केली.