दारव्हा (Yawatmal) :- तालुक्यातील चिखली रामनाथ येथे गावालगतच्या शेतातील गोडाऊनमधून 34 कट्टे सोयाबीन (Soyabean) चोरीला गेल्याची घटना दि. ३० जानेवारीच्या पहाटे ३. १७ मिनिटांनी घडली आहे. या प्रकरणी शेतकरी पंजाबराव झापरसा देवूळकर (वय 83) यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला(police station) तक्रार दाखल केली आहे.
डुप्लिकेट चावी वापरून उघडले गोदाम
तालुक्यातील चिखली रामनाथ येथील शेतकरी पंजाबराव देवूळकर व त्यांचा परिवार शेती व्यवसाय करतो. त्यांच्या 30 एकर शेतीतून उत्पादित 200 कट्टे सोयाबीन त्यांनी स्वतःच्या गावालगत असलेल्या शेतातील गोडाऊनमध्ये कुलूप लावून ठेवले होते. मात्र, दि. 30 जानेवारीला पहाटे 3.17 वाजता त्यांचे शेताशेजारी रसवंती असलेले रामधन राठोड यांनी त्यांच्या लहान मुलाला फोन करून गोडाऊनमधून अज्ञात व्यक्ती चारचाकी वाहनात सोयाबीन चोरून नेत असल्याची माहिती दिली. त्यावरून पंजाबराव देवूळकर व त्यांचा मुलगा महेश देवूळकर शेतातील गोडाऊनवर पोहोचले असता, त्यांना बाहेर 8 कट्टे सोयाबीन पडलेले आढळले. गोडाऊनच्या गेटचे कुलूप अबाधित असूनही आतमधील ३४ कट्टे गायब असल्याचे दिसले.
अज्ञात चोरट्यांनी डुप्लिकेट चावीच्या मदतीने कुलूप उघडून अंदाजे 17 क्विंटल, किंमत 68,000 रुपयाचे सोयाबीन लंपास केले आहे. शेतकरी पंजाबराव देऊळकर यांच्या तक्रारीवरून दारव्हा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.