नागपूर: अखेर राज्यातील पालकमंत्र्यांची यादी शनिवारी रात्री जाहीर करण्यात आली. गेले काही दिवस पालकमंत्री पदावरून तारीख पे तारीख.. असेच धोरण कायम होते. विरोधकांनी मुख्यमंत्री दावोस दौऱ्यात पालकमंत्री पदाची घोषणा करणार का, अशी टीका केली होती. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पालकमंत्री लवकरच घोषणा होणार असल्याचे सांगितले. अपेक्षेनुसार राज्याची उपराजधानी नागपूरचे पालकमंत्रीपद राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः एका कार्यक्रमात ते नागपूरचे पालकमंत्री होणार असल्याचे सूतोवाच केले होते. दुसरीकडे स्वतः बावनकुळे यांनी पालकमंत्री असल्याचे थाटात जिल्हा परिषदेत महानगरपालिकेची आढावा बैठक घेतली. या बैठकीवर काँग्रेसचे रामटेकचे खासदार शामकुमार बर्वे यांनी आक्षेपही घेतला. नागपूरसोबतच बावनकुळे यांच्याकडे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची देखील जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हावार महायुतीचे राजकीय संतुलन साधण्याचा प्रयत्न करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता स्थानिकांना महत्त्व देण्यात आले आहे.
विदर्भाचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तर सह पालकमंत्रीपद रामटेकचे शिवसेना आमदार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे महायुती सरकारने सोपविले आहे. विदर्भातील इतर जिल्ह्याचा विचार करता वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्थानिक राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, अकोला जिल्हा आकाश फुंडकर, वाशिम जिल्हा हसन मुश्रीफ, डॉ. अशोक उईके यांच्याकडे चंद्रपूर तर बुलढाणा जिल्हा मकरंद जाधव पाटील आणि भंडारा संजय सावकारे तर गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी बाबासाहेब पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.