Delhi Assembly Elections Result 2025 : राजधानी नवी दिल्लीत झालेल्या निवडणुकीत भाजपचा मोठा विजय झाला आहे. तब्बल २७ वर्षांनी भाजपने दिल्लीत कमबॅक केले असून आपला पराभवाचा दणका बसला आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल ४८ जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला २२ जागा मिळाल्या आहेत. तसेच काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. यामुळे दिल्लीत भाजपचे कमळ फुलले असून भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत आपचा पराभव होताच सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांच्या डोक्यात पैशाची, सत्तेची हवा गेली. त्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे अण्णा हजारे म्हणाले. आता अण्णा हजारेंच्या या प्रतिक्रियेवर शरद पवार गटाच्या नेत्याने खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार गटाचे नेते आणि आमदार उत्तम जानकर यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या निकालावर भाष्य केले. दिल्ली विधानसभेचा निकाल मला 100% अपेक्षित होता, असे उत्तम जानकर म्हणाले. यादरम्यान त्यांनी सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंवरही टीका केली. ते पंढरपुरात बोलत होते.
भाजपवाले केजरीवाल यांचा पराभव करणार
“दिल्ली विधानसभेचा निकाल मला 100% अपेक्षित होता. भाजपवाले केजरीवाल यांचा पराभव करणार आणि निवडून येणाऱ्या 25 जागाच तुम्हाला ठेवणार. उर्वरित सगळ्या जागांवर सेटिंग , प्रोग्रामिंग करणार आहेत. त्यावरच त्यांचा फोकस आहे अशी हिंट मी दिली होती”, असे उत्तम जानकर म्हणाले.
“काँग्रेसची संघटना दिल्लीमध्ये मजबूत नाही”
“बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या असत्या तर या निकालाचे चित्र वेगळे दिसले असते. भाजपच्या शून्य जागा आल्या असत्या. आपच्या 60 जागा आल्या असत्या. तर काँग्रेस सात ते आठ जागांवर विजयी झाले असते”, असा दावाही आमदार उत्तम जानकर यांनी केला. “काँग्रेसची संघटना दिल्लीमध्ये मजबूत नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये बदल करून दिल्लीमध्ये चांगली संघटना करणे गरजेचे आहे”, असेही उत्तम जानकर यांनी म्हटले.
“अण्णा हजारे हे अण्णा हजारे राहिले नाहीत”
“अण्णा हजारे हे अण्णा हजारे राहिले नाहीत. ते भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे झाले आहेत. अण्णा हजारे आता तटस्थ नाहीत. ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत”, अशी टीका आमदार उत्तम जानकर यांनी अण्णा हजारे यांच्यावर केली. “बिहार आणि हरियाणा राज्यातील जनतेला ईव्हीएमच्या बाबत ट्रेनिंग देण्याची गरज आहे. ईव्हीएम मशीनला आठ ते नऊ प्रकारे हेराफेरी आणि सेटिंग करता येते. त्याची माहिती इतर राज्यातील जनतेला देणे गरजेचे आहे. त्यासाठी मी पुढाकार घेणार आहे”, असेही उत्तम जानकर म्हणाले.
“ईव्हीएमच्या विरोधात जनजागृती करणार”
“मला या देशाची लोकशाही वाचवायची आहे. त्यासाठी मी पुढाकार घेऊन इतर राज्यातील निवडणुकीच्या आधी त्या त्या राज्यात जाऊन ईव्हीएमच्या विरोधात जनजागृती करणार आहे. ईव्हीएमच्या विरोधात जनजागृती करणार असल्याची घोषणा” आमदार उत्तम जानकर यांनी केली आहे.