अमरावती जिल्ह्यातील मेळघाटाच्या रेट्याखेडा गावात एका 77 वर्षीय महिलेने गावात नग्न अवस्थेत धिंड काढली. नंतर तिच्या तोंडाला काळे फासले आहे. पीडित महिला जादुटोणा करत असल्याच्या संशयावरून गावातील लोकांनी हे कृत्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेट्याखेडा गावात 77 वर्षीय महिला एकटी राहते. तिचे मुलं कामाच्या निमित्ताने बाहेर गावी राहतात. जादूटोण्याच्या संशयावरून तिची गावात धिंड काढत तिच्या तोंडाला काळे फासण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेमके काय घडले? 30 डिसेंबर रोजी रेट्याखेडा गावातील 77 वर्षीय आदिवासी वृद्ध महिला नेहमीप्रमाणे पहाटे 4 वाजता शौचास घराबाहेर पडली. यावेळी शेजारी राहणाऱ्यांनी महिलेवर जादू टोणा केल्याचा आरोप केला. त्यानंतर दोरीने बांधून लोखंडी रॉड गरत करत चटके दिले. तोंडाला काळे फासत मिरचीची धुरी दिली. एवढ्यावर हा प्रकार थांबला नाही तर महिलेच्या डोक्यावर गाठोडे देत बेदम मारहाण करत तिची गावातून धिंड काढण्यात आली. हा सर्व प्रकार घडत असताना गावातील लोकांनी बघ्याची भूमिका घेतली. यामध्ये पोलिस पाटील धिंडीत उपस्थित असल्याची माहिती आहे. 7 दिवसांनी पोलिसांत तक्रार दाखल या धक्कादायक घटनेनंतर पीडित महिलेने आपल्या मुलांना ही सर्व गोष्ट सांगितली. यानंतर 6 जानेवारीला तिने मुलांसह पोलिस ठाणे गाठले अन् तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तिच्या दोन्ही मुलांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेत, आईसोबत घडलेली घटना सांगितली. यानंतर खऱ्या अर्थाने घटनेला वाचा फुटली. पण या प्रकरणी काहीच कारवाई न झाल्याने पीडित महिलेने आपल्या मुलांसह 17 जानेवारी रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. पोलिसात तक्रार केली पण न्याय मिळाला नाही, असा आरोप करत महिलेच्या कुटुंबीयांनी राज्याचा महिला आयोग, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक आणि धारणी उपविभागीय अधिकारी यांना या तक्रारीची प्रत पाठवली.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)