Published on
:
08 Feb 2025, 7:40 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:40 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : Delhi Election Result 2025 | नवी दिल्ली मतदारसंघात भाजपचे प्रवेश वर्मा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. केजरीवाल ३१८२ मतांनी पराभूत झाले आहेत. केजरीवाल यांची ही चौथी निवडणूक होती आणि ते पहिल्यांदाच निवडणूक हरले आहेत. त्यांचा पराभव करणारे प्रवेश वर्मा कोण आहेत? जाणून घ्या.
प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र आहेत. ७ नोव्हेंबर १९७७ ला त्यांचा जन्म झाला. वर्मा यांनी एमबीए केले आहे. श्रीमती स्वाती सिंग या त्यांच्या पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष योगेंद्र शास्त्री यांचा त्यांनी पराभव केला. मे २०१४ मध्ये ते १६ व्या लोकसभेवर निवडून आले होते. १ सप्टेंबर २०१४ पासून ते नगरविकास स्थायी समितीचे सदस्य आहेत. १ सप्टेंबर २०१४ पासून ते संसद सदस्यांच्या वेतन आणि भत्त्यांवरील संयुक्त समिती आणि शहरी विकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालयाच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत.
मुख्यमंत्री पदासाठी नाव आघाडीवर
विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयाने मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत केजरीवाल यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे परवेश वर्मा यांचे नाव आघाडीवर आहे. प्रवेश वर्मा यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे देखील दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत.