महाराष्ट्र राज्य रोजगार हमी परिषदेच्या अध्यक्षपदी शहाजी पवार यांची निवडी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना आ. देवेंद्र कोठे व अन्य मान्यवर.Pudhari Photo
Published on
:
01 Feb 2025, 12:55 am
Updated on
:
01 Feb 2025, 12:55 am
सोलापूर : विधानसभेची निवडणूक ऐन मध्यावर आली होती... मध्यरात्री दीड-दोनच्या सुमारास स्वतः देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघाचा आढावा घेत होते... माझ्या मतदारसंघा मी फक्त प्रचार करायचा... बाकी सर्व जबाबदारी शहाजी पवार सांभाळतील. त्यांच्या जोडीला अविनाश महागावकर होतेच. अन् त्यामुळेच माझा विजय सोपा झाला, अशी कबुली खुद्द त्या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आ. देवेंद्र कोठे यांनी दिली.
निमित्त होते, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार यांच्या मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतात शुक्रवारी (दि. 31) झालेल्या हुरडा पार्टीचे. मोहोळ आणि अक्कलकोट या तिन्ही मतदारसंघाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पवार यांच्याकडे दिली होती. त्यानंतर एका मध्यरात्री आमच्या दोघांचा फोन झाल्यानंतर माझ्या सोलापूर शहर मध्य या मतदारसंघाचीही विशेष जबाबदारी फडणवीस यांनी पवार यांच्यावर सोपविली, अशी माहितीही आ. कोठे यांनी यावेळी दिली.
पवार यांच्या शेतात सालाबादप्रमाणे माध्यम प्रतिनिधींसाठी हुरडा पार्टी व स्नेह भोजनाचे आयोजन केले होते. याप्रसंगी अविनाश महागावकर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्य रोजगार हमी परिषदेच्या अध्यक्षपदी शहाजी पवार यांची शासनाने नुकतीच निवड केली. त्याप्रित्यर्थ पवार यांचा श्रमिक पत्रकार संघातर्फे सत्कार आ. कोठे आणि पत्रकार संघाचे अध्यक्ष खेलबुडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पवार यांनी सर्व माध्यम प्रतिनिधींचे आभार मानले.