Published on
:
08 Feb 2025, 7:40 am
Updated on
:
08 Feb 2025, 7:40 am
पुणे: मालधक्का चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व प्रस्तावित स्मारकासाठी राखीव भूखंड राज्य सरकारचा बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव असून त्याचा निषेध करण्यासाठी विस्तारीकरण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 7) मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले.
ही जागा स्मारकाला दिली नाही, तर राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला देण्यात आला. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले. त्यानंतर जिल्हाधिकार्यांनी या मागण्या सरकारकडे मांडून ठरवत दुरुस्ती करण्याचे तसेच या जागेवर भव्य संविधान भवन उभारू, असे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण कृती समिती पुणेच्या अंतर्गत विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, संस्था व पुणेकर जनता यामध्ये सहभागी झाली. या वेळी ज्येष्ठ आंबेडकरी नेते वसंत साळवे, मुख्य निमंत्रक शैलेश चव्हाण, माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, एल. टी. सावंत, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, अॅड. अविनाश साळवे, परशुराम वाडेकर, बाळासाहेब जानराव, रिपाइं अध्यक्ष संजय सोनवणे, राहुल डंबाळे, भगवान वैराट, शैलेंद्र मोरे, मनसेचे बाबू वागस्कर, आपचे मुकुंद किर्दत, पँथर नेते रोहिदास गायकवाड, बापूसाहेब भोसले उपस्थित होते.
डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ही जागा मुख्य सभेने स्मारकाला देण्याचे ठरले होते. 2016-17 मध्ये ही जागा ठराव करून सरकारने आरक्षण बदलून एमएसआरडीसीला जागा देण्यात आली. पुढे ससून रुग्णालयाचे कॅन्सर विभाग उभारण्याचे कारण दिल्याने आम्ही सहकार्य केले.
मात्र, 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा व्यावसायिक स्वरूपात वापरण्याचा निर्णय झाला. त्यामुळे ही जागा बिल्डरच्या घशात घालण्याचे काम झाले. हा भूखंड स्मारकासाठी राखीव असून, आमचा तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी त्वरित हा निर्णय मागे घेऊन या जागेवर भव्य स्मारक उभारावे.